रशियाला मदत करणाऱ्या ३७ कंपन्यांवर अमेरिका आणणार टाच

विविध संस्था अमेरिकेच्या रडारवर

रशियाला मदत करणाऱ्या ३७ कंपन्यांवर अमेरिका आणणार टाच

अमेरिका आणि रशियातील संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक ताणले जात आहेत. अमेरिका आता ३७ संस्थांवर निर्बंध लादणार आहे. या संस्था रशियाच्या ऊर्जा उत्पादनाचा विस्तार आणि भविष्यातील निर्यातक्षमता वाढवण्यास मदत करत असल्याचा आरोप आहे.

आर्कटिक एलएनजी २ ही संस्था ही रशियाच्या नैसर्गिक वायू योजनेसह मुख्य ऊर्जा योजना आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लावत आहे, असा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

रशियाच्या आर्कटिक एलएनजी २ या संस्थेव्यतिरिक्त तुर्कीस्थित संस्थांची नावेही अमेरिकेच्या रडारवर आहेत. यात डेनकर शिप कन्स्ट्रक्शन इनकॉर्पोरेटेड कंपनी आणि आयडी शिप एजन्सी ट्रेड लिमिटेड कंपन्यांचा सहभाग आहे. अमेरिकेने पावेल पावलोविच शेवेलिन या संस्थेचेही नाव यात समाविष्ट केले आहे.

शेवेलिन ही संस्था रशियातील भाडोत्री सैनिकांचा गट ‘व्हॅगनर’शी संबंधित आहे. ही संस्था डीपीआरकेपासून रशियापर्यंत युद्धसाहित्याचा पुरवठा करण्यातही सहभागी होती. ज्या संस्था युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाच्या शस्त्रांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मदत करतात, त्या संस्थांची नावेही यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

याआधी अमेरिकेने रशिया आणि उत्तर कोरियावर अधिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे नुकतेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला गेले होते. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये संभाव्य शस्त्रांच्या व्यवहाराबद्दल चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे अमेरिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची होणार तपासणी

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

चार जवान शहीद म्हणजेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ कायम असल्याचे संकेत

तर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुतिन यांच्यावर टीका केली आहे. जो बायडेन यांच्या धोरणाचा गैरफायदा घेऊन पुतिन हे अमेरिकेवर टीका करत आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

Exit mobile version