अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सरकारची स्थापना केल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातील लोकांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्डनं यासंदर्भात बोलताना सांगितलं की, अमेरिका अफगाणिस्तानातील जनतेसाठी ६४ दशलक्ष डॉलर्सची (जवळपास ४७० कोटी रुपये) मानवतावादी मदत देण्यासाठी तयार आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अफगाणिस्तानातील परिस्थित अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत अमेरिका ६४ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचं वचन देते.
अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्डनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “मला ही घोषणा करताना गर्व होतोय की, अमेरिका अफगाणिस्तानातील लोकांसाठी नवीन मानवतावादी मदत म्हणून ६४ दशलक्ष डॉलर्स देत आहे. हा नवीन निधी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला पाठिंबा देईल. आम्ही इतर देशांनाही एकता दाखवून मदत करण्याचं आवाहन करतो.”
अमेरिकेपूर्वी संयुक्त राष्ट्र प्रमुख, न्यूझीलंड, चीन, जर्मनीनं देखील अफगाणिस्तानला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारताच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’
दरम्यान, चीननं २०० दशलक्ष युआन (३१ दशलक्ष डॉलर्स) ची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री नानैया महुता यांनी सोमवारी बोलताना म्हटलं की, अफगाणिस्तानला मदतीच्या स्वरुपात ३ दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा करत आहे.