अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

अमेरिकेने केला खात्मा

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमेत मोठं यश मिळवलं आहे. अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जवाहिरीने अमेरिकेतील ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी हा अल-कायदाचं नेतृत्व करत होता. जवाहिरीवर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी ड्रोन हल्ला केला असता त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला.

जवाहिरी काबुलमधील त्याच्या घराच्या बाल्कनीत असताना ३१ जुलैला त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जो बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती. घरामध्ये जवाहिरीचं कुटुंबदेखील होतं. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

राष्ट्रकुल स्पर्धेत अचिंता शेउलीला सुवर्णपदक; भारताच्या नावे सहावं पदक

संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी

जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करत याला दुजोरा दिला आहे. “शनिवारी, माझ्या निर्देशानुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील काबुलमध्ये यशस्वीपणे हवाई हल्ला केला ज्यामध्ये अल-कायदाचा अल-जवाहिरी मारला गेला. न्याय मिळाला आहे,” अशा भावना जो बायडन यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमेरिकेसाठी आणि नागरिकांसाठी तुम्ही धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार. कितीही वेळ लागला तरी चालेल. तुम्ही कुठे लपण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही तुम्हाला शोधू,” असा इशारा यानिमित्ताने जो बायडन यांनी दिला आहे.

 

Exit mobile version