दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असताना इस्राईलच्या सैनिकांच्या गोळीबारात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकार शिरीन अबु अक्ला असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. सैनिकांच्या गोळीबारात शिरीन यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
इस्राईलच्या पश्चिम किनारपट्टीवरील जेनिन शहरातील निर्वासितांच्या छावणीमध्ये लपून बसलेल्या काही संशयित दहशतवाद्यांविरोधात इस्राईलही सैनिक कारवाई करत होते. या दरम्यान झालेल्या गोळीबारात पत्रकार शिरीन अबु अक्ला यांचा मृत्यू झाला. शिरीन यांच्या मृत्यूनंतर इस्राईलवर टीका केली जात आहे. पॅलेस्टाइन प्रतिनिधी मंडळ आणि ‘अल जझिरा’नेही शिरीन यांच्या मृत्यूसाठी इस्राईललाच जबाबदार धरले आहे.
शिरीन या कतारमधील ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीसाठी जेरूसलेममधील प्रतिनिधी म्हणून काम पहात होत्या. या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी शिरीन आणि इतर काही पत्रकार घटनास्थळी गेले होते. त्यांनी ‘पत्रकार’ असे लिहिलेले जॅकेटही परिधान केले होते. त्यानंतर दाहशवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून इस्राईलच्या सैनिकांनी मारलेली गोळी शिरीन यांच्या हाताला लागली आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन
राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा
राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
या दरम्यान एका स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकारालाही पाठित गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना लागलेली गोळी ही दाहशवाद्यांनी मारलेली असू शकते अशी शक्यता व्यक्त करत इस्राईलने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले असून सत्य समोर येण्यासाठी चौकशीची मागणी इस्राईलने केली आहे.