बंगा होणार जागितक बँकेचे अध्यक्ष

भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

बंगा होणार जागितक बँकेचे अध्यक्ष

मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. जागतिक बँकेच्या २५ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वित्त आणि विकासतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ६३ वर्षीय बंगा यांची या पदासाठी शिफारस केली होती.

ट्रम्प प्रशासनाच्या काळातील अर्थतज्ज्ञ आणि अमेरिकेचे माजी कोषागार अधिकारी डेव्हिड मालपास यांची जागा घेणारे ते एकमेव दावेदार होते.

सोमवारी जागतिक बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी बंगा यांची चार तास मुलाखत घेतली. मालपास यांचा बँकेत शेवटचा दिवस १ जून असेल. बोर्डाच्या २४ सदस्यांनी मतदान केल्यानंतर बंगा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रशिया मात्र या प्रक्रियेपासून दूर राहिला. अलीकडच्या आठवड्यात मंडळाच्या सदस्यांसोबत झालेल्या अनेक बैठका आणि सोमवारच्या औपचारिक मुलाखतीनंतर बंगा यांना मंडळाची मंजुरी सहज मिळेल, अशी अपेक्षा होती. एका सूत्राने बंगा यांचे ‘खरे बदल घडवणारे,’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. ‘जागतिक बँकेतर्फे विकसनशील देशांना शेकडो अब्ज डॉलरचे कर्ज दिले जाते. हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक कर्ज दिले जात आहे. अशा प्रकारच्या सुधारणांना ते गती देतील,’ असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस स्थापना झाल्यापासून जागतिक बँकेचे नेतृत्व अमेरिकेकडेच आहे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नेतृत्व एका युरोपियनकडे आहे. बंगा ज्यांचा जन्म भारतात झाला आणि आपली सुरुवातीची कारकीर्द त्यांनी येथेच घडवली. सन २००७पासून ते अमेरिकेचे नागरिक आहेत. बंगा यांच्या नावाची शिफारस केल्यापासून त्यांनी ९६ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तीन आठवड्यांच्या जागतिक दौऱ्यात त्यांनी सरकारी अधिकारी, व्यावसायिक नेते आणि नागरी समाज गटांना भेटण्यासाठी आठ देशांना भेटी दिल्या आहेत.

Exit mobile version