‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल

‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल

रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून अडकून पडले होते. या अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन पहिलं विमान शनिवारी मुंबईत दाखल झालं. त्यानंतर आता रोमानियाची राजधानी बुचारेस्ट इथून उड्डाण केलेलं दुसरं विमान देखील दिल्लीत दाखल झालं आहे. २५० भारतीयांना घेऊन हे विमान रविवारी सकाळी दिल्लीत दाखल झालं.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पाहिलं विमान (AI 1944) शनिवारी रात्री ७:४५ वाजता मुंबईत दाखल झालं. बुचारेस्ट येथील हेन्री कोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २१९ भारतीयांना घेऊन या विमानाने उड्डाण केलं होतं. हे विमान मुंबईत दाखल होताच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रवाशांचे स्वागत केले.

दुसऱ्या विमानाने (AI 1940) शनिवारी रात्री बुचारेस्ट येथून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. सकाळी ७:४५ च्या सुमारास विमान पोहचणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे विमान दिल्लीला दाखल झाले आहे. या विमानातून युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय नागरिक देशात परतले आहेत.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमधून ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा

पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे

‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’

आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार

रशियाने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये सध्या भयंकर परिस्थिती आहे. युक्रेनमधील सर्व हवाई मार्ग बंद असून भारताने युक्रेन शेजारील देशांमधून या अडकलेल्या भारतीयांची सुटका केली. यापूर्वीही एअर इंडियाचे एक विमान भारतीयांना आणण्यासाठी गेले असता त्यांना रिकामी विमान घेऊन माघारी परतावे लागले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी भारतीयांच्या सुटकेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर भारतीयांनी वाहनांमधून प्रवास करताना भारताचा ध्वज (तिरंगा) वाहनांवर लावावा अशा सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या होत्या.

Exit mobile version