चीनच्या शक्तीला अथवा संख्याबळाला आव्हान देणे जिथे शक्य नाही, तिथे मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दलाकडे चांगली रणनीती आणि तंत्रे आहेत, असा विश्वास एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. तसेच, चीन आणि पाकिस्तानच्या एकत्रित धोक्याचा सामना करण्यासाठी हवाई दलामध्ये लवकरच अडीच ते तीन लाख कोटी रुपये किमतीची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे आणि रडार दाखल करण्याचे प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले.
चीनलगतच्या सुमारे तीन हजार ४८८ किमीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर हवाई दलाकडून गुप्तचर यंत्रणा, संनिरीक्षण आणि टेहळणी या बाबींकडे सातत्याने बारकाईने लक्ष दिले जात आहे. एप्रिल आणि मे २०२०मध्ये पूर्व लडाखमध्ये भारताशी लष्करी संघर्ष झाल्यानंतर चीनने भारताच्या दिशेकडील सर्व हवाई तळ अद्ययावत केले आहेत. तसेच, चीनने अत्याधुनिक रडार स्थापन केले असून जमिनीवरून हवेत मारा करणारे शस्त्रही तैनात केले आहेत. भारतानेही जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रे, रडार आणि निम्न स्तरावरील वाहतूकयोग्य रडार वास्तविक नियंत्रण रेषेवर सज्ज ठेवले आहेत. आता भारतीय हवाई दलाला पर्वतावर उपयुक्त ठरू शकतील, अशा रडारांची आवश्यकता असून त्यायोगे शत्रू राष्ट्रावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी-हवाई दलाकडे भारतीय हवाई दलाच्या चौपट लढाऊ विमाने आणि बॉम्बर्स आहेत. ‘चीनने पूर्व लडाख भागामधून पूर्ण माघार घेईपर्यंत आमचे लष्कर तिथे नियुक्त राहणार आहेत. आमची मोहीम ही लवचिक आहे. आघाडीवर ज्या प्रमाणे परिस्थितीत बदल होईल. त्याप्रमाणे आमच्या मोहिमेतही बदल होतील,’ असे चौधरी यांनी सांगितले.
८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चौधरी बोलत होते.
हे ही वाचा:
पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार!
नेमबाजीने दिली सर्वाधिक सुवर्णपदके
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
‘पाकिस्तान लवकरच त्यांच्या ताफ्यात चिनी बनावटीचे जेएफ-१७ थंडर बहुपयोगी लढाऊ विमाने दाखल करणार आहेत. तसेच, अत्याधुनिक जे-१०जेट्स विमानेही दाखल करणार आहे. भारत आणि चीनचे सैनिक लवकरच एकत्र प्रशिक्षण घेत आहेत. याच प्रशिक्षणाचा एक भाग असलेला ‘शाहीन’ सराव गेल्याच महिन्यात चीनच्या वायव्य भागात पार पडला,’ असेही चौधरी यांनी सांगितले. परंतु असे असले तरी लवकरच १.७२ लाख कोटी रुपये किमतीची लढाऊ विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यात ९७हून अधिक तेजस मार्क १ ए ही लढाऊ विमाने असतील. अशा प्रकारच्या ८३ जेट्स विमानांचे ४६ हजार ८९८ कोटी रुपयांचे कंत्राट याआधीच फेब्रुवारी २०२१मध्येच हिंदुस्थान एरोनॅटिक्स कंपनीला देण्यात आले आहे.
१.२ लाख कोटी रुपये किमतीच्या तेजस लढाऊ विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानांची संख्या वाढेल. सध्या भारतीय हवाई दलाला ४२ तेजस विमानांची आवश्यकता असताना केवळ ३१ तेजस विमाने आहेत. ६० मिग-२१ विमाने सन २०२५ रोजी भारतीय हवाई दलातून निरोप घेतील. ही लढाऊ विमाने रविवारी प्रयागराज येथे होणाऱ्या भारतीय हवाई दल दिनामध्ये सहभागी अखेरची होणार आहेत. भारतात लवकरच ४५ हजार कोटी रुपये किमतीची १५६ ‘प्रचंड’ हलकी लढाऊ हेलिकॉप्टर दाखल करण्याचा प्रस्ताव आहे. सियाचेन ग्लेशियर आणि पूर्व लडाख भागांसारख्या उंच भागांत कारवाईसाठी ही हेलिकॉप्टर सक्षम असतील.