लॉजिस्टिक सपोर्ट (रसद पुरवणे), सुरक्षा आणि युद्धे लढण्यासाठीही जगभरातील देशांचा खासगी लष्करी कंपन्या ठेवण्याकडे कल वाढत चालला आहे. ब्लॅकवॉटर ही लष्कराची तुकडी इराकमध्ये दिलेल्या क्रूर वागणुकीमुळे कुप्रसिद्ध झाली होती. आता रशियातील ‘वॅगनर’ या खासगी लष्कराच्या गटाने सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारल्यानंतर जगभरातील अशा खासगी लष्कराच्या तुकड्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.
तो युद्धग्रस्त इराकमधला तसा नेहमीचा दिवस होता. एका गाडीमध्ये स्फोट झाला आणि ब्लॅकवॉटर या खासगी लष्करी कंपनीचे सशस्त्र सैनिक घटनास्थळी पोहोचले. परंतु तिथेच घटनेने जीवघेणे वळण घेतले. ब्लॅकवॉटरच्या एका सैनिकाने एका गाडीचालकाच्या डोक्यात गोळी झाडली, कारण काय तर तो थांबला नाही. चालकाचा मृत्यू झाल्याने ही गाडी ब्लॅकवॉटरच्या ताफ्याच्या दिशेने येत राहिली. त्यामुळे ब्लॅकवॉटरच्या सैनिकांनी मशीनगन आणि ग्रेनेड लाँचरने गोळीबार केला. त्यात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
जे आज युक्रेनमध्ये वॅगनर गट करत आहे, तेच काम तेव्हा ब्लॅकवॉटर गट इराकमध्ये करत होता. ते अमेरिकेसाठी इराकमध्ये युद्ध करत होते, जसे वॅगनर गट रशियासाठी युद्ध लढत आहे. चार दिवसांपूर्वी वॅगनर गटाने बंड पुकारून मॉस्कोच्या दिशेने कूच केल्यामुळे पुतिन यांच्या २० वर्षांच्या वर्चस्वाला हादरा बसला आणि या गटाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले.
खासगी लष्करी कंपन्या म्हणजे काय?
अमेरिका आणि रशियाप्रमाणेच अन्य देशही नियमित लष्करी दलाप्रमाणेच खासगी लष्करी कंपन्याही ताफ्यात ठेवतात. या कंपनीत लष्कराच्या माजी सैनिकांना समाविष्ट केले जाते. त्यात त्यांना रसद पुरवण्यापासून लढाई करण्यापर्यंत बरीच कामे करावी लागतात. अमेरिकेतील ब्लॅकवॉटर हा गट अधिकारी आणि सरकारी वास्तूंना सुरक्षा पुरवण्यापासून इराकचे नवे लष्कर आणि पोलिसांना प्रशिक्षित करणे आणि युद्धग्रस्त क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दलांना मदत करण्याचे काम करतो. ब्लॅकवॉटर हा गट संशयितांना अटक करून त्यांना तुरुंगात डांबून आणि त्यांचा अतोनात छळ करण्यासाठी कुप्रसिद्धआहे.
रशियाने युक्रेनमधील बखमत शहरावर ताबा मिळवण्यात वॅगनर गटाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. युक्रेनमधील सुमारे ५० हजार सैनिकांचे वॅगनर गट नेतृत्व करतो, अशी माहिती जानेवारीमध्ये युक्रेनच्या संरक्षण विभागाने दिली होती.
कोणकोणते देश खासगी लष्कर ठेवतात?
खाजगी सैन्याचा वापर नवीन नाही. प्राचीन इजिप्शियन फारोनी यांनी त्यांच्या नियमित सैन्याला पूरक म्हणून नुबियन धनुर्धारी आणि लिबियन सारथींसह असे भाडोत्री सैनिक नियुक्त केले होते. प्राचीन ग्रीक आणि रोमन साम्राज्याने भाडोत्री सैनिकांचा विविध भूमिकांमध्ये वापर केल्याचे सांगितले जाते. ब्रिटिश, फ्रेंच आणि डच यांच्यासह युरोपीय वसाहती शक्तींनी त्यांच्या वसाहती प्रदेशांचा विस्तार करण्यासाठी आणि स्थानिक लोकांना दडपण्यासाठी भाडोत्री सैनिकांची नियुक्त केली होती.
हे ही वाचा:
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या
मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!
सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण
शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर लष्कराला मदत करण्यासाठी, सुरक्षा पुरवण्यासाठी आणि रसद पुरवण्यासाठी अशा खासगी लष्कराच्या वापरात वाढ झाली. अशा खासगी सैन्याचा वापर आखाती युद्ध, बाल्कन संघर्ष, इराक युद्ध आणि अफगाणिस्तान युद्धादरम्यान झाला होता. अमेरिका आणि रशिया व्यतिरिक्त, यूएई, दक्षिण आफ्रिका, लिबिया आणि नायजेरियामध्येही याचा वापर केला गेला आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि तुर्की येथे खाजगी लष्करी कंपन्या आहेत.
रशियामध्ये वॅगनर व्यतिरिक्त इतर चार खासगी लष्कराचे गट आहेत. ब्रिटनमध्येहीही पाच खासगी लष्करी कंपन्या आहेत. यूएईमध्ये ब्लॅकवॉटरसह अनेक खासगी कंपन्यांकडून लष्करसेवा घेतली गेली आहे. या कंत्राटदारांचा येमेन आणि लिबियामधील संघर्षांमध्ये सहभाग आहे. नायजेरियन सरकारने बोको हराम या दहशतवादी गटाच्या विरोधात लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकन-आधारित कंपनी एसटीटीईपीसारख्या खाजगी लष्करी कंत्राटदारांची मदत मागितली आहे. केवळ जमिनीवरच नव्हे, तर खासगी भाडोत्री सैन्याचा विस्तार समुद्रापर्यंतही झाला आहे. सोमाली चाच्यांपासून जलवाहतूक मार्गांचे रक्षण करण्यासाठी देश अधिकाधिक अशा खासगी लष्करी कंपन्यांवर अवलंबून आहेत.