पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बॉम्बवर्षाव केल्याच्या एक दिवसानंतर इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. ही घटना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेनजीक इराणच्या दक्षिणपूर्व प्रांतात झाली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका सदस्याची हत्या करण्यात आल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थेने दिली. जिथे ही हत्या झाली, तो परिसर अत्यंत अशांत मानला जातो.
या प्रकरणी अधिकारी गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. हा हल्ला सिस्तान-बलूचिस्तान (इराण हद्द) प्रांतात झाला. सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांत किंवा ‘खरा बलूचिस्तान’ इराणच्या ३१ प्रांतांपैकी दुसरा सर्वांत मोठा प्रांत आहे.
इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बलूचिस्तान प्रांतातील एका सुन्नी दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केल्यानंतर इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. इराणच्या या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानमधील जैश-अल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन तळांवर मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.
हे ही वाचा:
धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!
पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…
आदित्य ठाकरेंना झटका, निकटवर्तीय सूरज चव्हाणला अटक
राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!
थंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!
तसेच, पाकिस्तानने बुधवारी या पार्श्वभूमीवर इराणमधून आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तसेच, सर्व आगामी उच्चस्तरीय द्विपक्षीय दौरे रद्द केले आहेत. हा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वेवर हल्ला असल्याची टीका पाकिस्तानने केली असून ही बेकायदा कारवाई कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
पश्चिम आशियामध्ये हमास आणि इस्रायलमधील युद्धामुळे आधीच परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. त्यात इराणने या हल्ल्यांची चिंता वाढवली आहे. जैश-अल-अदल दहशतवादी गट इराणच्या सैन्य दलावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करत आहे, असा इशारा इराणने वारंवार दिला आहे.