भारत आणि चीन यांच्यात गेली अनेक वर्षे सीमा वाद सुरू आहे. दरम्यान, याबाबतीत काही दिवसांपूर्वी मोठी घडामोड घडली असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी (एलएसी) दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीनमध्ये पुन्हा या भागातील वावराबाबत एकमत झाले आहे. अशातच भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील दोन राष्ट्रांच्या सैन्यांमधील संघर्ष संपवण्यासाठी करार केल्यानंतर काही दिवसांनीचं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यांच्या हालचालींची विघटन प्रक्रिया सुरू झाली आहे.
दोन्ही देशांच्या बाजूने तंबू आणि काही तात्पुरती संरचना उद्ध्वस्त करण्यात आली आहे. भारतीय सैनिक चार्डिंग नाल्याच्या पश्चिमेकडे परत जात आहेत, तर चिनी सैनिक नाल्याच्या पूर्वेकडे माघार घेत आहेत, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिली आहे. दोन्ही बाजूंनी सुमारे १०-१२ तात्पुरती बांधकामे आणि सुमारे १२ तंबू आहेत, जे काढले जाणार आहेत, अशी माहिती आहे. गुरुवारी चिनी सैन्याने या भागात त्यांच्या वाहनांची संख्या कमी केली आणि भारतीय सैन्यानेही काही सैन्य मागे घेतले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, येत्या चार- पाच दिवसांत डेपसांग आणि डेमचोकमध्ये पुन्हा गस्त सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत दोन्ही ठिकाणी तंबू आणि तात्पुरत्या पायाभूत सुविधा हटवण्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी म्हणजे आजही सुमारे या कामात २० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या दोन्ही देशांचे स्थानिक कमांडर या दोन ठिकाणांवर दररोज सकाळी संपर्कात आहेत आणि त्या दिवशी काय कारवाई करायची यावर चर्चा करत आहेत. मीटिंग पॉईंटवर दिवसातून एक- दोन वेळा बैठकाही घेतल्या जात आहेत, ज्यामध्ये विघटनाबाबत जे काही घडले ते शेअर केले जात आहे.
हे ही वाचा :
झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज
जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!
अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी माहिती दिली की, भारत आणि चीन दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत एक करार झाला आहे. या करारानंतर दोन्ही देशांच्या लष्करांमधील सीमेवर सुरू असलेली अडवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. चीनसोबत गस्तीच्या मुद्द्द्यांवर चर्चा केल्यानंतर आम्ही महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारामुळे सीमेवर दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेला तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे २०२० पर्यंत सीमेवर सुरू असलेला तणाव कमी होण्यास मदत होईल.