भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांना जगभरातून चांगलीच मागणी आहे. शस्त्रे निर्यात करण्याच्या या क्षेत्रात भारतासाठी ही आनंदाची बाब असून अनेक देश या क्षेपणास्त्रांची मागणी करत आहेत. भारत आणि रशियाने संयुक्तपणे ही क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या दोन देशांनी भारताकडून ब्राह्मोस खरेदी केल्यानंतर आता आणखी एक दक्षिणपूर्व आशियातील देश ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीवेळी इंडोनेशिया आणि भारत यांच्यात काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. यापैकी एक करार हा ब्रह्मोस क्षेपणास्त्रांबाबतही होणार आहे. भारत आणि रशियाने संयुक्तपणे ही क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत, ज्याची अनेक देशांकडून मागणी करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे म्हणजेच इंडोनेशियाचे राष्ट्रपती ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसंदर्भातील करारावर स्वाक्षरी करतील आणि पुढील काही वर्षात भारताकडून त्यांच्या मागणीची पूर्तता होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इंडोनेशियाचे ४०० सैनिक सहभागी होणार असून पहिल्यांदाच अतिथी देशाचे सैनिक प्रजासत्ताक परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
२०२० मध्ये प्रबोवो सुबियांतो संरक्षण मंत्री म्हणून भारतात आले होते. यादरम्यान त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती आणि त्यांनी क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र इंडोनेशियाचे बजेट नसल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. आता प्रबोवो सुबियांतो स्वतः सत्तेत आहेत आणि त्यांना पहिले वर्ष लोककल्याणकारी योजनांसाठी समर्पित करायचे आहे. अशा परिस्थितीत ते नवीन आर्थिक वर्षात शस्त्रे खरेदी करू इच्छितात. भारताचे इंडोनेशियाशी चांगले संबंध आहेत. इंडोनेशिया हा दक्षिणपूर्व आशियातील तिसरा देश आहे जो भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी करार करेल. यापूर्वी फिलीपिन्सने भारताकडून ही क्षेपणास्त्रे खरेदी केली होती. याशिवाय व्हिएतनामने क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार अंतिम केला आहे.
हे ही वाचा :
चक्क ‘सामना’ म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!
मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक
रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!
अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम
भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मॉस्का नदीच्या नावावरून हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सेवेत कार्यरत असून, हे क्षेपणास्त्र त्याच्या सुपरसॉनिक वेग, अचूकता आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाते. स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रेंज ३००- ५०० किलोमीटर दरम्यान आहे, ती कोणत्या प्रकारात आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्थापित केली आहे यावर अवलंबून आहे.