फेसबूक पाठोपाठ समाजमाध्यमांना दुसरा धक्का बसला आहे. फेसबूक पाठोपाठ मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या व्यावसायिक उपयोगाच्या लिंक्डिन या समाजमाध्यमावरील सुमारे ५०० मिलीयन वापरकर्त्यांचा डेटा लिक झाला आहे आणि तो विकला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सुमारे ५०० मिलीयन वापकर्त्यांचा डेटा अवैधरित्या हॅकर्सच्या एका संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबत हॅकर्सने वीस लाख वापरकर्त्यांचा डेटा या प्रकाराचा पुरावा म्हणून उपलब्ध करून दिला आहे.
हे ही वाचा:
इंग्लंडच्या प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्गचे निधन
या डेटा मध्ये लिंक्डीन वापरकर्त्यांचे पूर्ण नाव, इमेल आयडी, फोन नंबर, कामाच्या जागेची माहिती अशा प्रकारच्या डेटाचा समावेश आहे. या डेटाची विक्री किंमत चार आकडी ठेवण्यात आली आहे, आणि ती बिटकॉईनच्या रुपाने द्यायची असल्याची माहिती मिळत आहे.
लिंक्डिनकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विक्रीला ठेवलेला हा डेटा प्रत्यक्षात विविध संकेतस्थळे आणि कंपनी कडून गोळा करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच यात लिंक्डिनवर लोकांनी सर्वांसाठी खुली केलेली माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच यात कुठलीही खासगी माहिती देण्यात आलेली नसल्याने यात डेटा लीक नसल्याचे सांगण्यात आले आहे. लिंक्डिनने सांगितले की ते हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यामागे असलेल्यांना ते जबाबदार धरणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच फेसबुकवरून देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांचा डेटा लिक झाला होता. त्यात सुमारे ६१ लाख भारतीय वापरकर्त्यांचादेखील समावेश होता.