चिन्मय कृष्णा दास यांच्यानंतर बांगलादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक

इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी दिली माहिती

चिन्मय कृष्णा दास यांच्यानंतर बांगलादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक

बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. यातही हिंदूंना आणि त्यांच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याची बाब समोर आली आहे. अध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेनंतर काही दिवसांनी बांगलादेशातील चितगाव येथे आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्याम दास प्रभू असे अटक केलेल्या पुजाऱ्याचे नाव असून ते तुरुंगात चिन्मय कृष्ण दास यांना भेटला होता. कोणत्याही अधिकृत वॉरंटशिवाय त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

बांगलादेशच्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा चेतनाचे (इस्कॉन) माजी सदस्य हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर बांगलादेशची राजधानी ढाकासह विविध ठिकाणी हिंदू समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने सुरू केली. दास यांना जामीन न मिळाल्यानंतर मंगळवारी चितगाव न्यायालयाबाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक झाली अशातच एका वकिलाचा मृत्यू झाला. सहायक सरकारी वकील सैफुल इस्लाम यांच्या हत्येप्रकरणी किमान नऊ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. ४६ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर या लोकांना अटक करण्यात आली होती, ज्यापैकी बहुतेक अल्पसंख्याक हिंदू समुदायातील स्वच्छता कर्मचारी होते.

हे ही वाचा..

पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला काय करणार?

राज्यात ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी?

कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन

‘न्यूज २४’ कडून भारताचा जीडीपी कमी झाल्याचा खोटा दावा

घोषणाबाजी करणाऱ्या जमावाने शुक्रवारी बांगलादेशातील चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरांची तोडफोड केली. इस्कॉनच्या माजी सदस्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चितगावमध्ये निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता हा हल्ला झाला आणि त्यादरम्यान शांतेश्वरी मातृ मंदिर, शनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबारी मंदिराला लक्ष्य करण्यात आले. “नारेबाजी करणाऱ्या शेकडो लोकांच्या एका गटाने मंदिरांवर विटा आणि दगड फेकले, ज्यामुळे शनी मंदिराचे दरवाजे आणि इतर दोन मंदिरांचे नुकसान झाले,” अशी माहिती मंदिर अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून हल्लेखोरांनी मंदिरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

Exit mobile version