अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र, त्याविरोधात आता अफगाणिस्तानमधील महिलांनीच दंड थोपटले आहेत. उत्तर आणि मध्य अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला हातात बंदुका घेत रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी तालिबानविरोधी घोषणा दिल्या. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.
महिलांच्या या सशस्त्र आंदोलनांपैकी सर्वात मोठं आंदोलन अफगाणिस्तानमधील मध्य घोर प्रांतात झालंय. या ठिकाणी शेकडो महिलांनी हातात बंदुका घेत देशातील वाढत्या तालिबानच्या प्रभावाला विरोध करत घोषणाबाजी दिल्या आणि निषेध नोंदवला. हातात बंदुक घेतलेल्या या महिला युद्ध भूमिवर उतरणार नाहीत. हे केवळ प्रतिकात्मक आंदोलन आहे. कारण अफगाणिस्तानमधील परंपरावाद्यांचा दृष्टीकोन आणि अनुभवाची कमतरता यामुळे महिला थेट युद्धात उतरणार नाहीत. मात्र, तालिबान शासन अफगाणिस्तानमध्ये महिलांचं जगणं किती कठिण करतं याचा यावरुन अंदाज येतो. म्हणूनच महिला तालिबान राजवटीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.
बंदुका घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिलांपैकी काही आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांच्यापैकी काही महिला केवळ सुरक्षा दलाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दुसरीकडे आंदोलनात अशाही महिला आहेत ज्या खरंच युद्ध भूमीवर उतरून लढण्यासही तयार आहेत. याबाबत या महिलांना सरकारलाही आपण तालिबान्यांशी लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय.
हे ही वाचा:
बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार
नव्या रेल्वे मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय
कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
तालिबानने ग्रामीण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केलीय. असे अनेक जिल्हे जे आधी तालिबानविरोधी होते त्यांच्यावर आज तालिबानी गटांचं नियंत्रण आहे. या भागात तालिबान्यांनी पुन्हा एकदा महिलांवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केलीय. यात महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणे, त्यांच्या फिरण्यावर निर्बंध लादणे, कोणते कपडे घालावेत याचेही त्यांनी नियम केलेत. तसेच महिलांना बुरखा सक्ती देखील केली जातेय. एकूणच अफगाणिस्तानमधील तालिबानी महिलांना पुन्हा एकदा अधोगतीकडे घेऊन जाऊ पाहत आहेत.