अफगाणिस्तानने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

मागील काही आठवड्यांपासून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी यांना काबूल मध्ये बाँबचे लक्ष्य केले जात आहे. तालिबानला लवकरात लवकर हिंसाचार सोडून सलोखा प्रस्थापित करायला भाग पाडा असं अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानला सुनावलं आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

अमेरिकेने तालिबानसोबत झालेल्या आपल्या कराराचे पुनरावलोकन करणार असल्याचे सांगितल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला तालिबानला वठणीवर आणण्यासाठी भाग पाडण्यास सांगितले. तालिबानने आपली वचने पुर्ण करावीत आणि शांतता प्रस्थापित करावी यासाठी त्यांना भाग पाडा असे अखेरीस अफगाणिस्तानने त्यांना सुनावले आहे.

अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान आणि इतर राष्ट्रांनी तालिबानला शांततेसाठी भाग पाडावे असे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अमेरिकेने अफगाणिस्तानातील परिस्थिती उलटवू नये असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सरकारने वरील आवाहन केले.

अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार, तालिबान केवळ शांतता प्रस्थापित करण्यात अयशस्वी ठरला नसून हिंसक कारवायांमध्ये देखील वाढ झाली आहे. वाढलेल्या हत्यांच्या घटनांमुळे शांततेच्या बोलण्यांत बाधा निर्माण झाली आहे. आम्हाला आशा आहे की पाकिस्तान आणि इतर राष्ट्रे देखील शांतता प्रस्थापित करण्यासाठी साहाय्य करतील जेणेकरून शांततेचा मार्ग सुकर होऊ शकेल.

पाकिस्तानात तालिबानचे मोठे तळ आहेत. तालिबानच्या उच्च नेत्यांचे पाकिस्तान स्थान आहे. विशेषतः देशाच्या वायव्येला असलेल्या क्वेट्टा भागात त्यांचा मोठा तळ आहे. तालिबानच्या वतीने बोलणी करणाऱ्या मुल्ला अब्दुल घानी बरदार याने सांगितले की, पाकिस्तानातील तालिबानी नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व निर्णय घेतले जातात.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री कुरेशी यांच्यामते पाकिस्तानने शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले असून बाहेरी शक्तींमुळे आणि अफगाणिस्तानातील अंतर्गत वादांमुळे तिथे सतत हिंसक परिस्थिती राहिली आहे. अफगाणिस्तानातील तालिबानशी संबंध असलेल्या आतंकवादी संघटनांमध्ये अल्- कायदा, लष्कर-ए-तायबा, जैश-ए-महम्मद यांचा समावेश होतो.

Exit mobile version