हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याला ऑस्कर सोहळ्यातील त्याचे वर्तन चांगलेच भोवले आहे. विल स्मिथ हा आता पुढील १० वर्षे ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्याप्रकरणी विलवर ही बंदी घालण्यात आली आहे.
‘ऑस्करच्या मंचावर सूत्रसंचालक ख्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर हॉलिवूड फिल्म अकादमीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरने विल स्मिथला ऑस्करसह त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांवर उपस्थित राहण्यावर १० वर्षांसाठी बंदी घातली आहे,’ अशी माहिती शुक्रवार, ८ एप्रिल रोजी हॉलिवूड फिल्म अकादमीने दिली.
ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी डॅन हडसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘९४वा ऑस्कर सोहळा अनेकांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण विल स्मिथच्या अस्वीकार्य कृत्यामुळे त्यातील आनंदाचे क्षण धुळीस मिळाले. विशेष हे आहे की, या घटनेनंतर विल स्मिथने ख्रिस रॉकची माफी मागून १ एप्रिल रोजी अकादमीचा राजीनामा दिला होता.’
हे ही वाचा:
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने समर्थनीय नाहीत.
आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
चित्रपट सृष्टीत मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने मंचावर जाऊन सूत्रसंचालन करणाऱ्या ख्रिस रॉकला कानशिलात लगावली होती. ख्रिसने विलच्या पत्नीवर केलेले विनोद स्मिथला न आवडल्यामुळे संतप्त स्मिथने हे कृत्य केले होते. त्यानंतर या प्रकाराची माफीही मागितली होती.