डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने काल क्रिकेटमधील सर्वच प्रकारातून निवृत्ती घोषित केली आहे. एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर डिव्हिलियर्स हा फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवत होता. मात्र, आता त्याने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. समाज माध्यमांमार्फत डिव्हिलियर्सने त्याच्या निवृत्तीची घोषणा करत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला.

डिव्हिलियर्सने ट्विट करत म्हटले की, ‘माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत मी या खेळाचा खूप आनंद घेतला आहे. आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती आग पूर्वीसारखी धगधगत नाही.’ हेच सत्य असून त्याचा स्वीकार करायला हवा, असेही तो म्हणाला. जगभरातील विविध फ्रेंचायझीकडून खेळताना मला अनेक संधी आणि अनुभव मिळाले त्यासाठी ऋणी असल्याचेही डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

डिव्हिलियर्सने त्याच्या सह खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, विरोधी संघातील खेळाडूंचे आणि इतर कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत. संपूर्ण प्रवासात त्याला मिळालेल्या पाठींब्यासाठी धन्यवाद देताना त्याने साउथ अफ्रिका आणि विशेषतः भारताचा उल्लेख केला आहे. तसेच त्याने शेवटी आपल्या कुटुंबियांचे आभारही मानले आहेत.

एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. मेगा ऑक्शनपूर्वी बंगळुरूला निश्चितपणे त्याला संघात कायम ठेवायचे होते, मात्र डिव्हिलियर्सने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून एका युगाचा अंत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version