पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवार, १३ ऑगस्ट रोजी चिनी अभियंत्यांच्या एका चमुवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. शस्त्रसज्ज अशा दहशतवाद्यांच्या गटाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अजूनही पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याची माहिती आहे.
रविवारी सकाळी सुमारे साडे नऊ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. सध्या शहरातील रस्ते बंद करण्यात आले असून सरकारी अधिकाऱ्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला झालेल्या घटनेची पुष्टी केली आहे. चिनी अभियंत्यांवरील हल्ला फकीर कॉलनीच्या जवळ झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारले आहेत. अजूनही पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक न्यूज ‘बलुचिस्तान पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या ग्वादार शहरात स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील चीनच्या राजदुतांनी चिनी नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याची सूचना जारी केली आहे. चिनी अभियंत्यांच्या चमुवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ प्रतिकार म्हणून हल्ला सुरू केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर, काही दहशतवादी जखमी अवस्थेतच पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी
‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ला होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातही पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानाच्या ग्वादार बंदराचा विकास चीनकडून केला जात आहे. मागील वर्षी मे महिन्यात चिनी लोकांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी बसवर एका बुरखाधारी महिलेने आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता.