टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. पाणबुडीचा मागोवा घेण्यासाठी शोध आणि बचावमोहीम सुरू करण्यात आली आहे.
टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी एक छोटी पाणबुडी अटलांटिक महासागरात जहाजावरील कर्मचाऱ्यांसह बेपत्ता झाल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. समुद्रात ही पाणबुडी नेमकी कोठे बेपत्ता झाली, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. या पाणबुडीतून एका वेळी पाच जण जाऊ शकतात. तसेच, ‘टायटॅनिक’च्या भग्नावशेषापर्यंत पोहचण्यासाठी सुमारे आठ तास लागतात.
पाणबुडीचा मागोवा घेण्यासाठी शोध आणि बचावकार्य सुरू आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. ही पाणबुडी ‘ओशनगेट एक्स्पिडिशन्स’ कंपनीची आहे. ही कंपनी खोल समुद्रातील मोहिमांसाठी मानवयुक्त पाणबुडी पुरवते.
‘पाणबुडीतील व्यक्तींना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ‘सर्व पर्याय’ शोधले जात आहेत,’ असे कंपनीने निवेदनात म्हटले असले तरी नेमके कितीजण बेपत्ता झाले आहेत, याबाबत त्यांनी अधिक सांगितलेले नाही. मात्र या पाणबुडीत सहसा चार दिवसांचा ऑक्सिजनचा पुरवठा असतो. तसेच, पाणबुडी चालवणारा, तीन पर्यटक आणि कंपनीच्या सामग्री तज्ज्ञाचाही या ताफ्यात समावेश असतो.
हे ही वाचा:
दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर
सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती
सन १९१२मध्ये अटलांटिक समुद्रात पहिल्याच प्रवासादरम्यान तेथील हिमखंडाला आदळून टायटॅनिक हे जहाज बुडाले होते. त्यावेळी १५००हून अधिक जण मरण पावले होते. जहाजाचे अवशेष १९८५मध्ये अटलांटिक महासागराच्या तळाशी सापडले होते.