इस्रायल आणि हमास यांच्यात एकीकडे युद्धबंदीचा करार झालेला असताना दुसरीकडे इस्रायलमध्ये स्फोट झाले आहेत. इस्रायलमधील बसेसमध्ये झालेल्या स्फोटांमुळे देश हादरला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरुवारी संध्याकाळी इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळ तीन रिकाम्या बसेसमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
इस्रायलच्या मध्यवर्ती भागात एकामागून एक तीन बसेसमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी याला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु इतर दोन बसमध्ये अतिरिक्त स्फोटके आढळली आहेत. अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी या बॉम्बस्फोटांसाठी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुरक्षा बैठक घेणार आहेत. त्यामुळे नेतान्याहू काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.
इस्रायलमधील बात याम येथील बस डेपोमध्ये पार्क केलेल्या बसेसमध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर दोन स्फोट झाले. वृत्तानुसार, होलोनमध्ये तिसरा स्फोट झाल्याची नोंद झाली. चौथ्या बसमध्ये एक स्फोटक यंत्र, म्हणजेच बॉम्ब, देखील आढळला, जो निकामी करण्यात आला. बात यामच्या महापौर त्झिव्का ब्रोट म्हणाल्या की, बसेस रिकाम्या होत्या आणि पार्किंगमध्ये उभ्या होत्या, त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही हे सुदैवाने आहे.
हे ही वाचा :
‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी
‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन
ओटीटी प्लॅटफॉर्मना इशारा, आचारसंहितेच्या नियमांचे पालन करा नाहीतर…
२७० किलोचा बार मानेवर पडल्याने १७ वर्षीय पॉवर लिफ्टरचा मृत्यू!
इस्रायलमध्ये हा दहशतवादी हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इस्रायल आणि हमास युद्धबंदी करारावर वाटाघाटी करून पुढे जात आहेत. आतापर्यंत सात वेळा ओलिसांची देवाणघेवाण झाली आहे. युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत, हमासने आतापर्यंत १९ इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे. त्या बदल्यात, १,१०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आले आहे.