मानवी तस्करीच्या संशयामुळे फ्रान्समध्ये रोखण्यात आलेले चार्टर विमान २७६ प्रवाशांसह मंगळवारी मुंबई विमानतळावर उतरले. हे विमान चार दिवस विमानतळावर अडकले होते. हे विमान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विमानतळावर उतरले. विमानाने स्थानिक वेळेनुसार, दुपारी अडीच वाजता पॅरिसजवळील वेट्री विमानतळावरून उड्डाण केले होते.
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने उड्डाण केले तेव्हा, त्यात २७६ प्रवासी होते. तर, दोन अल्पवयीनांसह २५ नागरिकांनी फ्रान्समध्ये आश्रय मिळण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ते फ्रान्समध्येच थांबले आहेत. विमानला रोखल्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली.
हे विमान जेव्हा वेट्री विमानतळावर उतरले तेव्हा त्यात ३०३ भारतीय प्रवाशांसह ११ अल्पवयीन मुलेही होती. मात्र त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. या विमानाने दुबईहून निकारागुआ येथे उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान वॅट्री विमानतळावर उतरवावे लागले होते. यातून मानवी तस्करी होत असल्याच्या संशयावरून फ्रान्सच्या पोलिसांनी हे विमान रोखले होते.
हे ही वाचा:
इस्रायलने टिपला सिरीयात इराणचा अधिकारी
अंजू जॉर्ज म्हणते, तो काळ चुकीचा, मोदींच्या काळात खेळांची प्रगती!
अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!
सिने समीक्षक के. आर. के ला मुंबईत अटक
रविवारी फ्रान्सच्या न्यायालयात या संदर्भात सुनावणीही झाली. सुनावणीदरम्यान चार न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांकडे चौकशीही केली. या प्रवाशांमध्ये अनेक हिंदीभाषिक आणि तमिळभाषिक असल्याचे समजते. सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी हे विमान पाठवण्याचे आदेश दिले आणि काही अनियमितता असल्याचे सांगून सुनावणीही रद्द केली. तर, हे विमान ज्या हवाई वाहतूक कंपनीचे आहे, त्या लीजंड एअरलाइन्सने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणतेही गैरकृत्य केले नसून तपासात आपण सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असे स्पष्ट केले आहे.