बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक असलेल्या हिंदुंवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. जगभरात याची दखल घेतली जात असतानाचा आता भारतातील काही डॉक्टर्स हिंदूंच्या हितासाठी मैदानात उतरले आहेत. बांगलादेशमधील हिंदुंवर अत्याचार होऊ नयेत यासाठी महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील काही डॉक्टरांनी मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास त्यांनी नकार दिला आहे. कोलकात्याच्या माणिकतला येथील जे एन रे हॉस्पिटलने बांगलादेशी रुग्णांवर उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर कथित अत्याचार आणि भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयाचे अधिकारी सुभ्रांशु भक्त यांनी शुक्रवारी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलातना सांगितले की, “आम्ही एकाही बांगलादेशी रुग्णाला अनिश्चित काळासाठी उपचारासाठी दाखल करणार नाही अशी नोटीस जारी केली आहे. हा निर्णय मुख्यत्वे भारताविषयीच्या चिंतेमुळे घेण्यात आला आहे. देशाप्रती दाखवलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे कारवाई करण्यात आली आहे.” याशिवाय रुग्णालय प्रशासनाने कोलकात्याच्या इतर आरोग्य संस्थांनाही अशीच पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंशी होत असलेल्या गैरवर्तनाचा आणि भारतविरोधी भावनांचा प्रतिकात्मक निषेध म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा..
तिरुपतीत लाडू प्रकरण : एसआयटी चौकशी सुरू
आमदार भातखळकरांकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चा विशेष शो आयोजित!
निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाई जगतापांविरोधात तक्रार दाखल
पुढे सुभ्रांशु भक्त म्हणाले की, “आम्ही तिरंग्याचा अपमान होताना पाहिला आणि हे खूप दुःखद आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र असे असतानाही तेथे भारतविरोधी भावना दिसून येत आहे. आम्ही हे पाऊल उचलले आहे आणि आम्हाला आशा आहे की, इतर रुग्णालये देखील आम्हाला पाठिंबा देतील.”