भारतीय संरक्षण यंत्रणांनी मुंबई समुद्रकिनारी मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावर एक जहाज अडविण्यात आले असून हे जहाज चीनवरून पाकिस्तानला जात होतं, अशी माहिती आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे नौदलाने हे जहाज अडवलं असून यामध्ये आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्र कार्यक्रमासाठी लागणारी सामग्री सापडली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या संरक्षण यंत्रणेला गुप्तचर विभागाने सांगितलं होतं की, चीनवरून कराचीला जाणाऱ्या या जहाजात काही संशयास्पद वस्तू आणि शस्त्रास्रं असण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारावर न्हावा-शेवा बंदराजवळ हे संशयास्पद जहाज रोखण्यात आलं. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नौदलाने हे जहाज अडवलं असून यामध्ये आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्र कार्यक्रमासाठी लागणारी सामग्री सापडली आहे. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू या जहाजात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईवेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अधिकारीदेखील न्हावा-शेवा बंदरात उपस्थित होते. डीआरडीओ पथकाने चीनवरून पाकिस्तानला जाणाऱ्या या जहाजावर असलेल्या कार्गोंमधील मालाची तपासणी केली. तपासणीनंतर डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाकिस्तान या मालाचा वापर अणू कार्यक्रमासाठी करू शकतो. बॅलेस्टिक क्षेपणास्रं बनवण्यासाठी लागणारा मालही या कार्गोंमध्ये आहे.
या जहाजावर इटालियन कंपनीने बनवलेली कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन सापडली आहे. डीआरडीओचं पथक सध्या या मशीनची तपासणी करत आहे. डीआरडीओने सांगितलं आहे की, ही मशीन पूर्णपणे कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केली जाते. या मशीनचा क्षेपणास्रं निर्मितीच्या कामात वापर केला जातो. तसेच या संपूर्ण कन्साईन्मेंटमध्ये आण्विक शस्त्र आणि क्षेपणास्र निर्मितीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे पार्ट्स आहेत.
हे ही वाचा:
… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’
पाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या
वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर
याआधीही चीनहून पाकिस्तानला अशा पद्धतीने पाठविण्यात आलेली लष्करी सामग्री भारतीय यंत्रणांनी जप्त केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये, पाकिस्तानला औद्योगिक ड्रायर पाठविण्याच्या नावाखाली ऑटोक्लेव (लष्करी सामग्री) पाठविण्यात येत असल्याचे उघडकीला आले होते. पाकिस्तानी पुरवठादार कंपनी कॉस्मॉस इंजिनिअरिंग २०२२ पासून भारतीय यंत्रणांच्या ‘रडार’वर आहे. जून २०२३ मध्ये अमेरिकन उद्योग आणि संरक्षण विभागाने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित सामग्रीच्या तीन पुरवठादार कंपन्यांवर निर्बंध लादले होते.