सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये बुधवारी एका १३ वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केल्याने आठ मुले आणि एक सुरक्षा रक्षक ठार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात अनेकजण जबर जखमी झाले आहेत. कोस्टा केकमॅनोव्हिक असे या मुलाचे नाव आहे. आपल्या वडिलांच्या दोन बंदुका घेऊन शाळेत आलेल्या या मुलाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ही शाळा शहरातील मोठी शैक्षणिक संस्था आहे. मुलाने केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकासह सात मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. आणखी सहा मुले आणि एका शिक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सर्बियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने सांगितले.
आरोपीने आधी सुरक्षा रक्षकाची हत्या केली, नंतर दुसऱ्या वर्गात गेला जिथे त्याने त्याच्या काही शाळामित्रांना गोळ्या घातल्या. नंतर त्याने स्वत:हून पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि शाळेच्या अंगणात अटक होण्याची वाट पाहत राहिला. या मारेकऱ्याला नंतर शाळेतून अटक करण्यात आली.
गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचे शाळेतील वर्तन चांगले होते. तसेच, तो अभ्यासातही हुषार होता. त्यामुळे कुणालाच या घटनेबाबत अंदाज आला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पोलिस तपासात संबंधित विद्यार्थ्याने नियोजनबद्ध हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या विद्यार्थ्याने वर्गखोलीची चित्रे काढून कुणाला लक्ष्य करायचे आहे, याची यादी तयार केली होती.
हे ही वाचा:
आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा
पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट
राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!
कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस
‘मुलाच्या पालकांकडे काही शस्त्रे होती आणि त्यांनी ती तिजोरीत कुलूपबंद केली होती. कुलूप उघडण्यासाठी एक सुरक्षित कोडही होता. मात्र या मुलाकडे तो कोड असल्यामुळे तो या बंदुका सहजच हस्तगत करू शकला,’ अशी माहिती शहराच्या महापौरांनी दिली. त्यामुळे या मुलाच्या आई-वडिलांनाही अटक करण्यात आली आहे.