दिल्लीमध्ये होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. यावेळी जी- २० परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मॉरीशसला ‘अतिथी देश’ म्हणून विशेष आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान जुगनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. भारताच्या जी- २० अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कृतिगटांच्या तसेच मंत्रीस्तरीय बैठकांमध्ये मॉरीशसने दर्शवलेल्या सक्रिय सहभागाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.
भारत आणि मॉरीशस यांच्यातील राजकीय संबंधांना यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच, जी- २० शिखर परिषदेच्या विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे याबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी या नेत्यांनी भारत आणि मॉरीशस यांच्यातील बहुआयामी द्विपक्षीय संबंधांचा आढावा देखील घेतला.
हे ही वाचा:
शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे
पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद
ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार
दोन्ही देशांदरम्यान ३० हून अधिक शिष्टमंडळ स्तरीय दौरे आणि २३ द्विपक्षीय करारांवर झालेल्या स्वाक्षऱ्या यांसह गेल्या वर्षभरात भारत आणि मॉरीशस यांच्यातील द्विपक्षीय घडामोडी आणखी वेगवान झाल्या आहेत याची नोंद या नेत्यांनी घेतली. तसेच चांद्रयान- ३ मोहिमेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करून पंतप्रधान जुगनाथ यांनी अवकाश क्षेत्रात दोन्ही बाजूंकडून मिळणाऱ्या सहकार्यात यापुढे आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.