कोविड -१९ ने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेमधील मृतांची एकूण संख्या ही आता सात लाख झालेली आहे. यामध्ये काळजीची बाब हीच आहे की, तीन महिन्यांपूर्वी ही संख्या ६ लाख होती. अवघ्या तीन महिन्यांमध्ये १ लाख मृतांची वाढ झालेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वाढ अजूनही होईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, लसी न घेतलेल्यांना कोरोना झालेला असल्याचे समोर आलेले आहे. तसेच अशांना डेल्टा विषाणूची लागण झाल्याचेही समोर आले आहे.
सध्याच्या घडीला सात कोटी अमेरिकन नागरिक हे लसीकरणाशिवाय असल्याचे आता आकडेवारीनुसार स्पष्ट झालेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिकेमध्ये सर्व पात्र व्यक्तींना लस उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात सरासरी ८ हजार मृत्यू नोंदविले गेले आहेत. तर दर मिनिटाला सुमारे पाच मृत्यू नोंदवले गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अलीकडील आठवड्यांमध्ये जागतिक मृत्यू दर मंदावत आहे हे स्पष्ट झालेले आहे.
अमेरिकेमधील अनेकांनी लसीविषयी असलेल्या अज्ञानामुळे आणि गैरसमजामुळे लस घेणे टाळलेले आहे. जवळपास लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांनी लसीकरणाकडे त्यामुळे पाठ फिरवली आहे. शुक्रवारी ७ लाख मृत्यूंचा आकडा अमेरिकेमध्ये नोंदविला गेला आहे. तसेच अनेक कोरोना रुग्ण हे अमेरिकेमध्ये रुग्णालयात दाखल होत नसल्याचेही आता समोर आले आहे. थंड हवामानामुळे अनेकजण घरातच विलगीकरणात राहणे पसंत करत आहेत.
हे ही वाचा:
… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!
आर्यन खानसह तिघांना राहावे लागणार एक दिवस कोठडीत
अवजड वाहनाच्या मालकांवर गुन्हे दाखल करणे अवघड?
दक्षिण अमेरिकेत जगात सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. जगभरातील नोंदवलेल्या मृत्यूंपैकी दक्षिण अमेरिकेतील प्रमाण हे २१ टक्के आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका आणि पूर्व युरोपचा मृत्यू दर हा प्रत्येकी 14 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे रॉयटर्सच्या विश्लेषणानुसार समोर आलेले आहे.