दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरातील पाच मजली इमारतीला गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे भीषण आग लागली होती. या भीषण आगीत तब्बल ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोहान्सबर्ग शहराच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये गुरुवारी ही घटना घडली. आग लागण्याचं कारण स्पष्ट नसून, याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती जोहान्सबर्ग प्रशासनाने एक्स हँडलवरून या भीषण दुर्घटनेची माहिती देताना दिली आहे.
जोहान्सबर्ग इमर्जन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवक्ते रॉबर्ट मुलौझी यांनी म्हटले की, “आग लागलेल्या इमारतीमधून ६० हून अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कित्येक जणांवर उपचार सुरू आहेत. इमारतीमध्ये आणखी काही लोक अडकले असून, बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. आगीची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात
८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!
‘इंडिया’च्या बैठकांचे आयोजन करणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी उडवतायत
भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद
आग आता आटोक्यात आली असून काही भाग अद्याप धुराने व्यापलेला आहे. बऱ्याच ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे. या इमारतीमध्ये सुमारे २०० बेघर लोक आसरा घेऊन राहत होते. ही संपूर्ण इमारत आता काळी पडली असून सर्व खिडक्यांमधून धूर निघत आहे.