रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेले युद्ध अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीचं युक्रेनने रशियाच्या एका इमारतीवर ड्रोन हल्ला केला होता. यानंतर आता रशियाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रशियाने युक्रेनच्या मध्यवर्ती भागात क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४१ नागरिक ठार झाले असून, १८० जण जखमी झाले आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, रशियन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या मध्यवर्ती भागातील पोल्टावा प्रदेशातील दोन शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमारे ४१ नागरिक ठार झाले आहेत. तर १८० जखमी झाले आहेत. हा आता पर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्सची एक इमारत अंशतः नष्ट झाली आहे. शिवाय अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. देशातील आपत्तकालीन यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमेन्को यांनी सांगितले की, हल्ला झालेल्या संस्थेची इमारत ही नागरी निवासी इमारतींपासून फार दूर नाही. त्यामुळे झालेल्या स्फोटांमुळे अनेक निवासी इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत आणि नुकसानही झाले आहे. दरम्यान, बचावकर्त्यांनी आग आटोक्यात आणली असून सध्या ढिगारा साफ करण्याचे काम सुरू आहे. २५ लोकांना वाचविण्यात आले, त्यापैकी ११ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा..
छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा
ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती
कोलकाता: हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याला ८ दिवसांची सीबीआय कोठडी !
वैयक्तिक मालमत्तेची माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखले
अमेरिकेच्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला २६ ऑगस्ट रोजी रशियामध्ये झाला होता. ९/११ च्या हल्ल्यात विमान इमारतीला धडकले होते. या हल्ल्यात युक्रेनचे ड्रोन रशियातील गगनचुंबी इमारतीला धडकले होते. युक्रेनियन ड्रोनने शहरातील सर्वात मोठ्या इमारतीला धडक दिल्याने रशियातील साराटोव्हमध्ये घबराट पसरली होती. त्यानंतर आता रशियाने हा हल्ला केला आहे.