भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईत सोमालियाच्या ३५ चाच्यांना पकडण्यात आले होते. ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. सोमालियाच्या किनारपट्टीवर केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या ३५ चाच्यांना घेऊन आयएनएस कोलकाता ही युद्धनौका शनिवारी सकाळी मुंबईत दाखल झाली. नौदलाने ही माहिती दिली. या दरोडेखोरांना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हिंद महासागरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचा आणि या भागातील चाचेगिरी रोखण्याचा निर्धार या कारवाईतून दिसून आल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील २,६०० किमी पूर्वेला एका व्यापारी जहाजाला सोमालियाच्या चाच्यांनी बंदी बनवले होते. त्यानंतर केलेल्या कारवाईत सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने कोंडीत पकडले होते. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडले होते. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलाने त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे. गेल्या सात वर्षांत सोमालियाच्या चाच्यांकडून अशा प्रकारे जहाजाची सुटका करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले.
भारतीय नौदल ३५ चाच्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले होते. भारतीय कायद्यांनुसार, विशेषत: सीमा शुल्क आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात यांना सोपवण्यात आले.
हेही वाचा :
भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार
टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र
काही दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेलेल्या मुस्तफिजुरचा आयपीएलमध्ये दमदार कमबॅक
स्वातंत्र्यवीर ‘सावरकर’ बॉक्स ऑफिसवर हिट
नौदलाची ही मोहीम ४० तास चालली. यावेळी समुद्री चाच्यांनी भारतीय जवानांवर गोळीबारही केला. या कारवाईत ३५ समुद्री चाच्यांना ताब्यात घेण्यात आले. या व्यापारी जहाजावरील १७ क्रू मेंबर्सचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते. नौदलाने सांगितले की, एक्स-एमव्ही रुएन या जहाजाचा वापर सागरी क्षेत्रात चाचेगिरीसाठी आणि व्यावसायिक जहाजांना बंधक बनविण्यासाठी केला जात होता.