मोरोक्कोत विध्वंस, ३०० मृत्यू

दुर्घटनेत १५३ लोक जखमी

मोरोक्कोत विध्वंस, ३०० मृत्यू

मोरोक्कोमध्ये शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला असून १५३ जण जखमी झाल्याची माहिती मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. या भीषण भूकंपामुळे झालेला विद्ध्वंस लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

भारतीय वेळेनुसार, शनिवारी पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास) मोरोक्कोत भूकंप झाला. भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, मराकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला आहे. युनेस्कोकडून मराकेशला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

मराकेशमध्ये राहणारे नागरिक ब्राहिम हिम्मी यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना मराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. प्रशासनासह नागरिकांनीही कोसळलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचे काम सुरू केले.

गेल्या १२० वर्षांतील सर्वांत शक्तीशाली भूकंप

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या १२० वर्षांतील हा सर्वांत शक्तीशाली भूकंप आहे. १९०० पासून या भागातील ५०० किमी परिसरात एम- ६ किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम- ५ पातळीचे केवळ नऊ भूकंप नोंदवले गेले आहेत.

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक

पाठीशी तीन भावंडे असलेला ‘गोविंदा’ झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित

बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दखल

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

पंतप्रधान मोदींकडून संवेदना व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद क्षणांमध्ये माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे,” असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

Exit mobile version