जर्मनीमधील पुरातत्त्वविभागाच्या तज्ज्ञांनी एक तलवार उत्खननात शोधून काढली असून ही तलवार कांस्ययुगातली असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे अजूनही ही तलवार उत्तम स्थितीत असून त्यावरील माणके चमकत आहेत. ही तलवार ३ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.
बवारिया येथील नॉर्डलिंगन या भागात ही तलवार सापडली. एक पुरुष, एक महिला आणि एका मुलाच्या थडग्यात ही तलवार सापडली. या तिघांनाही घाईगडबडीत पुरण्यात आले असावे पण या तिघांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. बवारियन राज्याने याबाबतीतले पत्रक काढून या तलवारीबाबत माहिती दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ही तलवार इतक्या उत्तम स्थितीत आहे की, ती अजूनही चमकत आहे. या तलवारीची मूठ ही कांस्यापासून तयार करण्यात आली असून त्याला हिरवा रंग आहे. याचा अर्थ त्या कांस्यात तांबे आहे. पाणी आणि वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे ते हिरवे झालेले आहे.
पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, १४व्या शतकातली ही तलवार असून केवळ कुशल लोहारच अशा प्रकारची अष्टकोनी मूठ असलेली तलवार घडवू शकतात. या तलवारीच्या पात्यावर कुठेही तुटल्याच्या खुणा अथवा युद्धात वापरल्याच्या खुणा दिसत नाहीत. याचा अर्थ केवळ समारंभासाठी अशा तलवारीचा उपयोग केला गेलेला आहे.
जर्मनीत दोन ठिकाणी अशा प्रकारच्या तलवारी तयार केल्या जात होत्या, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यात दक्षिण जर्मनी आणि उत्तर जर्मनीत त्यात घडवल्या जात होत्या. पण ही तलवार कुठे तयार करण्यात आली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.