रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. गेल्या दोन महिन्यांतील युक्रेन शहरांवर रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर युक्रेनने प्रतिहल्ल्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी पहाटे हा हल्ला कलरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या उमान शहरातील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. उमानमध्ये रशियन हल्ल्यात दोन मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यातील १२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कीवच्या दक्षिणेस सुमारे २१५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमान शहरात नऊ मजली निवासी इमारतीवर हल्ला करण्यात आला. युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लेमेंको यांनी सांगितले की, या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या राष्ट्रीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१७ जण जखमी झाले असून तीन मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
युक्रेनमधील निवासी इमारतीवर झालेल्या दोन क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये यापैकी बहुतांश लोकांचा मृत्यू झाला आहे . रशियाच्या या प्राणघातक हल्ल्यानंतर कीवमध्ये सर्वत्र हाहाकार माजला होता. या हल्ल्यात नुकसान झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिणपूर्वेकडील डनिप्रो शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक दोन वर्षांचा मुलगा आणि एक ३१ वर्षीय महिला ठार झाली आणि तीन जण जखमी झाले. युक्रेनच्या राजधानीवर ९ मार्चनंतर पहिल्यांदाच हल्ला झाला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.
हे ही वाचा:
नारायण कार्तिकेयनला गवसला उद्योगाचा ‘फॉर्म्युला’; दोन वर्षांत १७८ कोटींचा उद्योग
कुस्तीगीरांच्या आंदोलनात राजकारण शिरले; प्रियांका गांधींनी घेतली खेळाडूंची भेट
सत्यपाल मलिक यांच्यावर पाच तास प्रश्नांची सरबत्ती
रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !
राजधानी कीवजवळील युक्रेन्का शहरात झालेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत . कीवला हानी पोहोचवण्यासाठी डागलेली ११ क्षेपणास्त्रे आणि दोन ड्रोन आकाशात नष्ट करण्यात आले. क्रेमेनचुक आणि पोल्टावा शहरांवर देखील क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत, परंतु अद्याप नुकसानीची नोंद झालेली नाही.
रशियन सैन्याने डागलेली २३ पैकी २१ क्रूझ क्षेपणास्त्रे लक्ष्यावर येण्यापूर्वीच पाडण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. शुक्रवारच्या हल्ल्यात युक्रेनचे विद्युत प्रकल्प आणि नागरी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही असे सांगण्यात आले. आम्ही एकत्रितपणे रशियाचा दहशतवाद संपवू, आम्ही त्याचा पराभव करू. हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आल्यास अंतिम इशारा समजा, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नागरिकांना सांगितले आहे.