उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. बचाव पथकाकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी या संबंधित माहिती दिली आहे.
बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी प्रांतातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुदुरलुगु खाणीत शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी हा भीषण स्फोट झाला. प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट फायर एम्पमुळे झाला असावा, अशी माहिती तुर्कीचे ऊर्जामंत्री फातिह डोनमेझ यांनी दिली आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थानिक वेळेनुसार सुमारे ३.१५ वाजता खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खाली स्फोट झाला. यामध्ये ४४ जण खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खाली तर पाच जण सुमारे ३५० मीटर खाली अडकले होते. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी खाणीत तब्बल ११० कामगार उपस्थित होते. ४९ जण अतिजोखमीच्या भागात होते. स्फोटानंतर काही कामगार पळून जाण्यात यशस्वी झाले. पण अनेकजण खाणीबाहेर पडता न आल्यानं खाणीतच अडकून पडले.
हे ही वाचा:
INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह
हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड
उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?
तुर्कस्तानची आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने अपघाताबाबत माहिती देताना सांगितलं की, शेजारील प्रांतांसह अनेक बचाव पथकं या भागांत पाठवण्यात आली आहेत. तसेच तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हे आज, १५ ऑक्टोबर रोजी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत.