१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवार, १५ जानेवारी रोजी पाकिस्तानमधील कराची येथे सलीम गाझी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता. सलीम गाझी हा छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. दाऊदसोबतही त्याचे जवळचे संबंध होते.
The most wanted 1993 serial blast accused Salim Gazi, a member of the Dawood gang and close aide of Chota Shakeel died on Saturday in Karachi, Pakistan: Mumbai Police Sources
— ANI (@ANI) January 16, 2022
सलीम याचा शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. १९९३ च्या स्फोटानंतर सलीम गाझी हा दाऊदच्या आश्रयाला गेला होता. सलीम गाझी हा १९९३ च्या स्फोटातील फरार आरोपी होता. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सलीम गाझी हा महत्त्वाचा आरोपी होता. त्यानंतर सलीम हा दाऊद सोबतच परदेशात पळून गेला होता. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात सलीम गाझी व्यतिरिक्त छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि त्याच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. या हल्ल्यात सुमारे २५० लोकांचा मृत्यू झाला होता तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
हे ही वाचा:
एसटीच्या “लेखा” विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली..!
मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय
पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन
संपूर्ण देश १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने हादरुन गेला होता. मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते. या घटनेने संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. पहिला स्फोट मुंबई शेअर बाजाराजवळ दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला होता. तर शेवटचा स्फोट दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झाला होता. २००७ साली या प्रकरणातील खटल्याच्या पहिल्या टप्प्यात टाडा न्यायालयाने याकुब मेमनसह १०० आरोपींना दोषी ठरवले होते, तर २३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.