मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिराती (युएई) येथून अटक झाली आहे. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा साथीदार असून गेल्या २९ वर्षांपासून तपास यंत्रणा याचा शोध घेत होत्या. बकर विरुद्ध १९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रात्रे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देण्यात अबू बकरचा महत्त्वाचा सहभाग होता. मुंबईच्या मालिका बॉम्बस्फोटात वापरलेल्या आरडीएक्सचे कोकणात लँडिंग आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी कट रचण्यातही बकर याचा महत्त्वाचा सहभाग होता, अशी माहिती तपासातून समोर आली होती. अबू बकर हा पाकिस्तान आणि यूएईमध्ये वास्तव्यास होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीवरून त्याला पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी
मुंबईतील उद्यानाला ‘ख्वाजा गरीब नवाज’ नाव दिल्याने वाद
अभिनेते किरण माने यांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा
‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’
यापूर्वी २०१९ मध्ये अबू बकरला अटक करण्यात आली होती. पण काही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे तो युएईच्या अधिकार्यांच्या ताब्यातून सुटला होता. यूएईमध्ये बकर याला अटक करण्यात आल्यानंतर आता भारतीय एजन्सी बकरच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात दिले जाईल.
१९९३मध्ये मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं होत. मुंबईत वेगवेगळ्या १२ ठिकाणी स्फोट घडवण्यात आले होते. त्यात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते.