सागरी सीमा ओलांडून गेलेले १९८ मच्छिमार मायदेशात परतले

१९८ भारतीय मच्छीमारांची सुटका

सागरी सीमा ओलांडून गेलेले १९८ मच्छिमार मायदेशात परतले

पाकिस्तान सरकारने शुक्रवार, १२ मे रोजी रात्री १९८ भारतीय मच्छीमारांची सुटका केली. या मच्छिमारांना सागरी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पकडण्यात आले होते. सागरी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या मच्छिमारांवर संबंधित देशांच्या पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होऊन त्यांना सुमारे कमीत कमी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

पाकिस्तान सरकारने अटारी- वाघा सीमेवर या मच्छिमारांना सोडले असून या १९८ भारतीय मच्छिमारांनी सांगितले की, त्यांनी मासेमारी करताना नकळत सागरी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. भारतीय आणि पाकिस्तानी मच्छीमार अनेकदा अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडतात. त्यावेळी दोन्ही देशांच्या यंत्रणा त्यांना पकडतात आणि मच्छिमारांना शिक्षेला सामोरे जावे लागते.

“मला पाच वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. १२ जणांना दोन बोटींमध्ये सीमा ओलांडली म्हणून पकडण्यात आले होते. समुद्रात सीमा दर्शवणारे कोणतेही चिन्ह नसल्यामुळे आम्हाला सीमा ओलांडल्याचे कळले नाही. आता देशात परत आल्याने खूप आनंद झाला आहे,” असं पाकिस्तान सरकारने सोडलेल्या मच्छिमारांपैकी एक बिकू म्हणाला.

“आम्ही समुद्र ओलांडून पाकिस्तानात गेलो, तिथे कोणतीही सीमा नाही. आम्हाला २०१८ मध्ये पकडले गेले. काही जण अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत त्यांना मदत करावी अशी विनंती आहे. त्यांनी आमच्या बोटी घेतल्या आणि त्या परत केलेल्या नाहीत,” असं आणखी एक मच्छीमार म्हणाले.

सागरी सीमा ओलांडल्यावर पाकिस्तानी अधिकारी मच्छिमारांना अटक करतात. त्यावेळी त्यांच्याकडचे सामान आणि बोटीही जप्त केल्या जातात. या जप्त केलेल्या बोटी मच्छिमारांना परत कराव्यात, अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.

Exit mobile version