कायमच वादग्रस्त असणारे स्वघोषित स्वामी नित्यानंद हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नव्या राष्ट्रासाठी’ तीन दिवसीय व्हिजा देत असल्याची घोषणा केली आहे. नित्यानंद यांच्या ट्रस्टच्या संकेतस्थळावरून व्हिजासाठी अर्ज करता येणार आहेत. ‘कैलासा’ ला जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया वरून विशेष खाजगी विमानसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना ऑस्ट्रेलिया पर्यंत स्वखर्चाने जायचे आहे. पुढील सर्व व्यवस्था नित्यानंद ट्रस्ट तर्फे मोफत करण्यात येणार आहे. यात कैलासा पर्यंतचा प्रवास,निवास आणि जेवण यांचा समावेश आहे. नित्यानंद यांनी एक व्हिडीओ प्रकाशित करून याची माहिती दिली.
नित्यानंद यांच्यावर अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. गेल्या वर्षी ते भारतातून फरार झाले. नंतर त्यांनी एका बेटावर ‘कैलासा’ नावाचा नवीन देश स्थापन केल्याची घोषणा केली. या कथित देशाचे नेमके ठिकाण कोणालाच माहित नाही. पण कैलासा ऑस्ट्रेलियाच्या जवळ असल्याचे म्हंटले जात आहे. भारतासकट इतर कोणत्याही देशाने या कथित नव्या देशाला मान्यता दिलेली नाही. उलट भारताने कायमच ‘कैलासाचे’ खंडन केले आहे.