कॅनडामधील हिंदू मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर १४ गोळ्या झाडल्या

सरे प्रांतातील लक्ष्मी नारायण मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला

कॅनडामधील हिंदू मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर १४ गोळ्या झाडल्या

खालिस्तानी मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील वाद ताणलेले असतानाचं कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कॅनडाच्या सरे प्रांतातील लक्ष्मी नारायण मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.

लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात घरावर तब्बल १४ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गुरुवार, २८ डिसेंबर रोजी रात्री हल्ला करण्यात आला. गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आणि सीसीटीव्ही चित्रण गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

सतीश कुमार यांनी सांगितले की, “ज्या घरावर हल्ला झाला, तिथे त्यांचा मुलगा राहत आहे. पोलिस सध्या हल्लेखोरांचा तपास करत आहेत. हा हल्ला कुणी केला? हे आता सांगणे कठीण आहे,” असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मंदिरांवर हल्ले झाले होते. त्याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी असा काही संबंध असेल हे आताच सांगता येणार नसल्याचे म्हटले.

लक्ष्मी नारायण मंदिराने मागच्या महिन्यात खलिस्तानी कट्टरतावाद्यांचा निषेध नोंदविला होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला चढविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लक्ष्मी नारायण मंदिर किंवा मंदिराशी संबंधित सदस्यांना लक्ष्य करण्याची ही तिसरी वेळ आहे.

हे ही वाचा:

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

ऐकतेस ना ज्ञानदा? भाडखाऊंचे प्रलाप

पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!

ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!

याचवर्षी ऑगस्ट महिन्यात कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर कॅनडातील भारतीय हिंदू समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर भीषण हल्ला करण्यात आला आहे.

Exit mobile version