प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू

हल्लेखोराचाही मृत्यू

प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू

युरोपातील झेक प्रजासत्ताकमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. झेक प्रजासत्ताकमधील प्रतिष्ठित अशा प्राग विद्यापीठात ही धक्कदायक घटना घडली आहे. अतिशय संपन्न असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या प्रागमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याने तो शिकत असलेल्या विद्यापीठातच हा गोळीबार केला असून या सगळ्या धुमश्चक्रीत त्याचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवार, २१ डिसेंबर रोजी झेक प्रजासत्ताकमधील प्रतिष्ठित प्राग विद्यापीठात गोळीबार झाला. २४ वर्षीय हल्लेखोर तरुणाने आधी त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो प्राग विद्यापीठात शिरला आणि मुख्य इमारतीत त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात इमारतीतील १३ जणांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांशी झालेल्या धुमश्चक्रीमध्ये स्वत: हल्लेखोरही ठार झाला आहे. या घटनेनंतर झेक प्रजासत्ताक सरकारनं २३ डिसेंबर रोजी एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे. हल्लेखोराने आत्महत्या केली की पोलिसांच्याच गोळीबारात तो ठार झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेनंतर पोलिसांना प्राग विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खालच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गोळ्या सापडल्या. हल्लेखोर तरुण क्लाडगो भागातील त्याच्या घरातून निघाला असून तो आत्महत्या करू शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्याच्या शोधात निघालेही. मात्र, काही मिनिटांतच या तरुणाच्या वडिलांची हत्या झाल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तातडीने प्राग विद्यापीठात धाव घेत तेथील कला विभागाची इमारत रिकामी केली. हल्लेखोर तिथे एक लेक्चर ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण पोलिसांचा अंदाज चुकला. हल्लेखोर तरुण थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये शिरला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने मुख्य इमारतीच्या दिशेनं धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर तरुणानं गोळीबार करून १३ जणांचे प्राण घेतले होते.

हे ही वाचा:

लोकसभेतून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित!

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

भारतीय नौदल बनवत आहे भूमिगत पाणबुडी बंकर

प्रशांत कारुळकर यांना मेजर जनरल विक्रांत नाईक यांच्याकडून सन्मानचिन्ह

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण त्याच्या महाविद्यालयातील अभ्यासात अत्यंत हुशार होता. तसेच, त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे या तरुणानं असं कृत्य का केलं? याचा तपास पोलीस आता करत आहेत.

Exit mobile version