इराकच्या निनेवेह प्रांतात सुरू असलेल्या विवाहसोहळ्यात आग लागून सुमारे १००जण ठार, तर १५० जण जखमी झाले आहेत. येथे ख्रिश्चन धर्मीयांचा विवाहसोहळा सुरू होता. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ही घटना इराकच्या निनेविह प्रांतातील हमदानिया भागात घडली. येथे प्रामुख्याने ख्रिश्चनधर्मीय राहतात. हा भाग बगदादची राजधानी मोसूलपासून ३३५ किमी दूर आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण हॉलच आगीच्या ज्वाळांनी पेटल्याचे टीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आग विझल्यानंतर या ठिकाणी दिसत आहेत ते केवळ जळालेले धातूचे तुकडे आणि ढिगारा. अनेक नागरिक अंधारातच शोध घेत असल्याचे दिसत आहे. या आगीतून वाचलेल्या नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘या दुर्घटनेतील जखमींना सर्वतोपरी साह्य केले जाईल,’असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र यांनी स्पष्ट केले आहे. तर, पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी या आगीच्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, गरजूंना तातडीने मदत देण्याचे निर्देश गृहमंत्रालय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी विवाहसोहळ्याप्रसंगी केलेल्या आतिशबाजीमुळे ही आग लागली असावी, त्यातून उडालेल्या ठिणगीमुळे विवाहसोहळ्यातील एखाद्या वस्तूने पेट घेतला असावा आणि ही आग वाऱ्यासारखी पसरली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या विवाहसोहळ्यात अतिशय ज्वलनशील अशा वस्तूंची सजावट केली होती, जे देशामध्ये बेकायदा आहे.
आगीची ठिणगी या हॉलच्या भिंतीवर पडली असावी, या भिंतीवर जाड थर देण्यात आला होता. मात्र हा थर अति ज्वलनशील होता. तसेच भिंत बांधण्यासाठीही निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने ती अवघ्या काही मिनिटांतच कोसळली आणि आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अशा प्रकारे बेकायदा सजावट करण्यास इराक प्रशासनाने परवानगी कशी काय दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यामागे भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. सजावटीसाठी वापरले जाणारे काही थर अग्निरोधकही असतात, याकडेही जाणकार लक्ष वेधतात.
हे ही वाचा:
गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का
… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन
विद्यार्थ्यांच्या राजकारणाचे पर्यवसान आंतरराष्ट्रीय गँगस ऑफ पंजाबमध्ये
भारतीय खेळाडू ‘घोड्या’वर स्वार
आधीच इराकमध्ये गेल्या दोन दशकांत कट्टरवादी संघटनांकडून ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केले जात असताना अनेक जणांनी युरोप, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेत आश्रय घेतला आहे. त्यात ही आगीची दुर्घटना घडल्यामुळे इराकमधील अल्पसंख्य ख्रिश्चन समुदायाची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्या इराकमध्ये सुमारे दीड लाख ख्रिश्चनधर्मीय राहतात. सन २००३मध्ये त्यांची लोकसंख्या १५ लाख होती. इराकची एकूण लोकसंख्या चार कोटींहून अधिक आहे.