रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. २ जूनला या युद्धाला १०० दिवस पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी या दिवसाच्यापूर्वी म्हणजेच २३ फेब्रुवारीपर्यंत तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार, रशिया युक्रेनवर आक्रमण करणार अशा अनेक बातम्या होत्या. मात्र, तरीही दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल, त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा साऱ्या जगाला होती. पण २४ फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि रशियाने युक्रेनवर हल्ला केला. या घटनेला २ जून या दिवशी १०० दिवस पूर्ण झाले.
१०० दिवसात युक्रेनने अजूनही राशियासमोर हार मानलेली नाही. मारियोपोल सोडलं तर रशियाला युक्रेनच्या एकाही शहरात निर्णायक असा विजय मिळवता आलेला नाही. युक्रेनचा आकार आणि दोन्ही देशांच्या सैन्यदलांमधली तफावत पाहता, युद्धानंतर अगदी काही दिवसांमध्येच युक्रेन शरण येईल किंवा किमान अपेक्षित अटीशर्तींवर राजी होऊन हार मानेल असं जगाला वाटलं होतं किंवा रशियालाही अशीच अपेक्षा होती. मात्र, तसं अजिबात घडलेलं नाही. १०० दिवस झालेत आणि अजूनही युक्रेनकडून रशियाला चिवट प्रतिकार केला जातोय.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांचा आत्मविश्वास आणखी बळावत चालल्याचे चित्र आहे. “युक्रेनचं लष्कर युक्रेनमध्ये आहे. युक्रेनचे नागरिक युक्रेनमध्ये आहेत. १०० दिवसांपासून युक्रेनचं रक्षण आपण केलंय आता विजय आपलाच आहे,” असा निर्धार झेलेन्सकी यांनी केला आहे. या युद्धाची मोठी किंमत दोन्ही देशांना मोजावी लागत आहे.
या वादाच कारण म्हणजे युक्रेनला हवं असलेलं नाटोचं सदस्यत्व. त्याला रशियाकडून असलेला विरोध आणि इशारा देऊनही युक्रेन ऐकत नाही म्हटल्यावर २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिका तसेच काही युरोपीय देश युक्रेनच्या बाजूने उभे राहिले. रशियावर व्यापारी आणि आर्थिक निर्बंध लादण्यात आले. शिवाय युक्रेनला मदत देऊ केली. त्यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला होत असलेली मदत आणि रशियावर लादले जात असलेले निर्बंध या कोंडीमुळे युद्ध लवकर संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ना पुतीन मागे हटले ना झेलेन्सकी.
युद्धाला १०० हून अधिक दिवस झालेत तर सध्या युद्धभूमीत काय परिस्थिती आहे?
युक्रेनचा २० टक्के भूभाग सध्या रशियाच्या ताब्यात असल्याची कबुली झेलेन्स्की यांनी दिली आहे. दररोज जवळपास ६० ते १०० युक्रेनियन सैनिक शहीद होत असल्याचंही त्यांनी सांगितल आहे. दोन्ही देशांचे हजारो सैनिक आणि अधिकारी आतापर्यंत मारले गेलेत पण त्याविषयी निश्चित आणि अधिकृत अशी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, ४ हजारहून अधिक नागरिक या युद्धात आतापर्यंत मरण पावलेत. शिवाय ८० लाखांहून अधिक युक्रेनियन देशांतर्गत विस्थापित झालेत. ६० लाखांहून अधिक नागरिक युक्रेन सोडून गेलेत. तरीही अजूनपर्यंत युक्रेनची राजधानी कीव्हचे रक्षण करण्यात युक्रेन यशस्वी ठरलाय. युक्रेनमधलं शहर मारियोपोलनंतर रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले सुरू ठेवून रशियाला लागून असलेल्या युक्रेनच्या पूर्व भागावर लक्ष केंद्रित केलं आहे. व्यापारी दृष्ट्या युक्रेनची कोंडी झालेली असताना जवळपास ९० टक्के लुहान्स्क प्रांत आणि ७० टक्के डॉनेत्स्क प्रांत रशियाच्या ताब्यात आहे. त्यानंतर क्रिमिया आणि आसपासच्या प्रदेशावर वर्चस्व मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न असेल, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. तसं झालं तर मात्र, संपूर्ण दक्षिण-आग्नेय युक्रेन रशियाच्या ताब्यात येईल आणि युक्रेनची सगळी महत्त्वाची बंदरं रशियाच्या नियंत्रणाखाली येतील.
रशिया- युक्रेन युद्धामुळे युक्रेनचं किती नुकसान झालं आहे?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या आकडेवारीनुसार साधारण ३८ हजार बिल्डिंग, घरे पाडण्यात आली आहेत. २ लाख २० हजार लोक बेघर झालेत. १ हजार ९०० शैक्षणिक संस्थांचं नुकसान झालं आहे. साधारण ३०० गाड्या, ५० रेल्वे ब्रिज, ५०० कारखाने आणि ५०० हॉस्पिटल्सचं नुकसान झालं आहे.
रशिया- युक्रेन युद्धाचा जगावर काय परिणाम झाला आहे?
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन करतात. मात्र, रशियावर असलेले निर्बंध आणि युक्रेनमधली परिस्थिती यामुळे दोन्ही देशांमधून होणारा गहू पुरवठा खंडित झाला आहे. तेल आणि खत दोन्हीही बाबतीतही हेच चित्र आहे. त्यामुळे जगभरातील व्यापाराच्या साखळीमध्ये व्यत्यय आला आहे. अर्थात याचा फटका सगळ्याच देशांना बसला आहे. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी रशियाच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बँकांवर बंदी घालण्यात आली आहे. रशियन तेलावर आणि नैसर्गिक वायूवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या युरोपियन देशांना या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. शिवाय युरोपने रशियावर निर्बंध लादण्यासाठी म्हणून तेल आयात करणं टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेल यांसारख्या इतर खाद्यतेलांसाठी युक्रेन आणि रशिया हे दोन देश प्रमुख उत्पादक आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये या तेलांच सुमारे ८० टक्के उत्पादन हे दोन देश करतात. मात्र, सध्या त्याचा पुरवठा सुरळीत होत नाहीये. त्यामुळे या तेलांच्या किंमतीत प्रचंड वाढ झालीये.
जगभरात महागाई वाढलीये. याचा परिणाम सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागलाय. भारताच्या शेजारच्या देशांचा विचार केला तरी श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. पाकिस्तान दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. नेपाळची अर्थव्यवस्था ढासळली आहे. युरोपीय देशांमध्येही महागाईचं संकट आहे.
रशिया- युक्रेन युद्धाचं पुढे काय होऊ शकतं?
जगातला एकही देश युक्रेनच्या मदतीला थेट जाऊ इच्छित नाही. त्याऐवजी लष्करी मदत, आर्थिक मदत देऊन युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी मदत करायला तयार आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी हे देश लष्करी सामग्री पुरवण्यात आघाडीवर आहेत. शिवाय रशियावर टप्प्याटप्प्याने निर्बंध घालत आर्थिक दृष्ट्या त्या देशाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा:
‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले
देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, तिघांचा मृत्यू
जगातील मोठ्या देशांना भारताकडून अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करावी, युद्धात मध्यस्ती करावी अशी अपेक्षा अनेक देशांनी ठेवली होती. अगदी खुद्द युक्रेननेही अपेक्षा ठेवली होती. मात्र, भारताने सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर तटस्थ भूमिका कायम ठेवली आणि दोन्ही देशांनी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावे असा सल्ला नेहमीच दिला. एकूणच परिस्थिती पाहता सध्या तरी पुतीन हार मानतील किंवा रशिया या निर्बंधांसमोर हात टेकेल अशी लक्षण सध्या तरी नाहीत.
निर्बंध आणि युद्धाच्या आर्थिक झळा रशियाला बसू लागल्या असल्या, तरी रशियामध्ये फारसा अंतर्गत विरोध नाही. राजकीय विरोधकही नाही. स्वीडन आणि फिनलँडही नाटोमध्ये सहभागी होत असल्यामुळे ही संघटना खरोखरच आता रशियाच्या सीमेला भिडणार आहे. त्यामुळे रशिया अधिक आक्रमक होऊ शकतो अशी शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता एकतर हे युद्ध अजून अनेक महिने सुरू राहू शकते. पुतीन युद्धविराम जाहीर करू शकतात किंवा पुन्हा एकदा युक्रेनचं राजधानीचं शहर कीव्हवर आणि इतर महत्त्वांच्या शहरांवर आक्रमण करू शकतात. युक्रेनचं सैन्य लढून रशियन सैन्याला पुन्हा माघारी पाठवू शकते किंवा चर्चेतून मार्ग काढून हे युद्ध संपू शकते. दरम्यानच युक्रेनमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या रशियन सैनिकांची संख्यासुद्धा वाढू लागलीये. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.