मुंबई शहराचा मानबिंदू, ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेने स्थानक विकासांसाठी स्थापन केलेल्या उपकंपनी ‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी)ने’ यासंबंधीची निवीदा नुकतीच उघडली आहे. त्यातून या कामासाठी १० कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्याचे कळले आहे.
आयआरएसडीसीने निविदा उघडल्यानंतर १० कंपन्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या नुतनीकरण्याच्या कामासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात जीएमआर प्राव्हेट लि., आयएसक्यु एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट, कल्पतरू पॉवर ट्रान्स्मिशन लि., ऍन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेन्टस् होल्डिंग्ज लि., अदानी रेल्वेज् ट्रान्सपोर्ट लि., ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर फन्ड आयव्ही, मॉरिबस होल्डिंग्ज लि., गोदरेज प्रॉपर्टिज् लि., किस्टोन रिऍल्टर प्रा.लि., ओबेरॉय रिएल्टी लि. या कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत.
आयआरएसडीसी यानंतर प्रत्येक कंपनीची गुणवत्ता छाननी करेल. त्यानंतर पुढील टप्प्यास म्हणजे निवडक कंपन्यांकडून त्यांच्या कामाचा प्रस्ताव मागविण्यात येईल. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या या इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाचा एकूण खर्च ₹१,६४२ करोड अंदाजे आहे. तर इमारतीची किंमत ₹१,४३३ करोड आहे.
नुतनीकरणाच्या कामात १९३० नंतरच्या काळात कोणत्याही नियोजनाशिवाय करण्यात आलेले बदल तोडून उत्तम नियोजन करून त्याला अद्ययावत करण्याचे योजले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नुतनीकरणानंतर हे स्थानक विविध तऱ्हेच्या वाहतुकीसाठी एक ठिकाण बनेल. नवी इमारत प्रतिक विक्री केंद्रे, खाद्यपदार्थांची दुकाने आणि विविध वस्तुंची दुकाने इ. सोयी- सुविधांनी युक्त असेल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.