सौदी अरेबिया तेलाचे उत्पादन घटवणार

सौदी अरेबिया तेलाचे उत्पादन घटवणार

जागतिक तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी उचलले पाऊल

सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात एकतर्फी १ दशलक्ष घट करणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच इराण त्यांच्या तेलाचे उत्पादन वाढवून जागतिक तेलाच्या किंमती पाडण्याची तयारी करत असताना, सौदी अरेबियाचा हा निर्णय धक्कादायक आहे. यामुळे पुन्हा डोके वर काढत असलेल्या कोरोना महामारीतून सावरणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची सौदी अरेबियाची चिंता व्यक्त होते.

इतर बड्या तेल उत्पादक देशांसोबत झालेल्या बैठकीनंतर सौदी अरेबियाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तेल उत्पादक देशांचे सौदीच्या नेतृत्वाखालील ओपेक देश आणि रशियाच्या नेतृत्वाखालील दुसरा गट असे दोन गट आहेत. या दोन्ही गटांना एकत्रितपणे ओपेक- प्लस असे संबोधले जाते. नुकत्याच झालेल्या बैठकीत, एका गुंतागुंतीच्या करारानुसार या दोन्ही गटांनी आपापले तेल उत्पादन सध्याची परिस्थिती जैसे थे राहिल एवढ्याच प्रमाणात ठेवण्याचे कबूल केले आहे.

सौदी अरेबियाच्या घोषणेनंतर ओपेक- प्लसच्या तेलाच्या किंमती एकदम वधारल्या. वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट या अमेरिकी मानांकनाच्या किंमतीत ५.२ टक्क्यांची वाढ झाली. फेब्रुवारी नंतर पहिल्यांदा $५० च्या वर या मानांकनाची किंमत गेली होती. तर ब्रंट क्रुड तेलाच्या किंमतीत ४.९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

या बाबत बोलताना सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुल अझीझ बिन सलमान यांनी सांगितले की, हा एकतर्फी निर्णय आम्ही, आमची आमच्या मित्रांची, सहकाऱ्यांची, ओपेक प्लस देशांची अर्थव्यवस्था चांगली रहावी आणि या उद्योगाचे भले व्हावे म्हणून घेतला.

जगात पुन्हा एकदा कोरोनाचा धुमाकूळ वाढत असल्याने अनेक देशांत निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे तेलाच्या उत्पादनात अचानक मोठ्या प्रमाणात घट केल्याचा नेमका फायदा किती होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या जगात तेल उत्पादनात सर्वात लवचीक असणाऱ्या देशाने आपण तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी तत्पर असल्याचा स्वच्छ संदेश दिला आहे.

क्रुड तेलाच्या किंमतीवर अमेरिकेतील शेल कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचे प्रमाण ठरते. जर तेलाच्या किंमती सातत्याने $५० प्रति बॅरलच्या वर राहिल्या तर शेल कंपन्यांना तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनासाठी यावर्षी $६२ बिलियन एवढी रक्कम घालवली असेल. ही किंमत तेलाच्या किंमती $४० प्रति बॅरल असताना कराव्या लागणाऱ्या खर्चापेक्षा  ११ टक्क्यांनी जास्त आहे.

ओपेक प्लसचा करार अगदी साधासरळ झाला नाही. रशियाने तेल उत्पादन घटवायला कडक विरोध केला होता. त्यामुळे रशिया आणि कझाकिस्तानला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येकी उत्पादन ६५,००० बॅरल प्रतिदिन वाढवायला परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version