पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आत्मघाती हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाच चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक स्थानिक ड्रायव्हरही मारले गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानात झाला आहे. सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पाकिस्तानचा सर्वांत मोठा दुसऱ्या क्रमांकाचा नौदल हवाईतळ पीएनएस सिद्दीक याच्यावर हल्ला केला. खैबर पख्तुनख्वा येथील शांगलामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्लेखोराने त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात दुर्दैवाने मृत झालेले चिनी नागरिक हे पेशाने इंजिनिअर होते. ते पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. डॉन न्यूजनुसार, एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या घटनेतील मृतांचा आकडाही वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीही गेल्या वर्षी चिनी नागरिकांना लक्ष्य करून पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले होते. हे हल्ले पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रकल्पांना आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे.
Atleast 5 Chinese govt personnel killed in a suicide bomb attack in Shangla area of Pakistan.
— WLVN🔍 (@TheLegateIN) March 26, 2024
दरम्यान, पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी सोमवार, २५ मार्च रोजी रात्री तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदलाच्या हवाईतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. दोन्ही ठिकाणी गोळीबार आणि स्फोट झाल्याची सूचना मिळाली. प्रतिबंधित बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)च्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदलाच्या हवाईतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. माजिद ब्रिगेडचा बलूचिस्तान प्रांतातील चीनच्या गुंतवणुकीला विरोध आहे.
हे ही वाचा:
गाझामधील युद्धबंदीचा संयुक्त राष्ट्रांचा ठराव; इस्रायलची अमेरिकेवर टीका
विराट कोहलीचे टी-२० क्रिकेटमधील १०० वे अर्धशतक
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार
‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण
याआधी, २० मार्च रोजी बीएलएच्या माजिद ब्रिगेडने बलुचिस्तानस्थित ग्वादर पोर्ट ऑथोरिटी कॉम्प्लेक्समध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्यात दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ दहशतवादी मारले गेले होते. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी ग्वादर बंदर महत्त्वपूर्ण आहे. या अंतर्गत अब्जावधी डॉलर किमतीचे रस्ते आणि ऊर्जाप्रकल्प उभारले जाणार आहेत.