चीनने अरुणाचल प्रदेशवरील (चिनी नाव झांग्नान) दाव्याचा आपला हेका कायम ठेवत येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ३० ठिकाणांना चिनी नावे दिली आहेत. त्यांची यादी त्यांनी रविवारी जाहीर केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र चीनच्या या दाव्याला ठाम विरोध करून अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, याचा पुनरुच्चार केला आहे. चीनच्या आगाऊपणाचा हा पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनकडून अरुणाचल प्रदेशला झांगनान संबोधले जाते. चीनने रविवारी या भागातील १२ पर्वत, चार नद्या, एक तलाव, एक डोंगरातील रस्ता, ११ निवासी भाग आणि एक जमिनीचा एक भाग या ठिकाणांची नवी नावे जाहीर केली. ही नावे येत्या १ मेपासून लागू होणार आहेत.
सन २०१७मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची नावे जाहीर केली होती. तर, सन २०२१मध्ये १५ आणि सन २०२३मध्ये ११ ठिकाणांची नावे जाहीर केली होती. भारताने मात्र चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला ठाम विरोध केला असून अरुणाचल हा देशाचा महत्त्वाचा भाग असून अशा प्रकारे नावे बदलून वास्तव बदलणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.
हे ही वाचा:
जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप; जीवितहानी नाही
ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!
छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!
सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप
‘आज जर मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील. नाव बदलल्याने काही फरक पडत नाही,’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट सांगितले. भारताचे लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.