नायजरमध्ये दहशतीच्या सावटात मतदान

नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील देश. हा संयुक्त राष्ट्रांच्या मतानुसार सर्वाधिक गरीब देशांपैकी एक आहे. एकेकाळी फ्रान्सची वसाहत असलेल्या नायजरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा निवडणूका होत आहेत. विजेत्या उमेदवारासमोर गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटे आ वासून उभी आहेत.

नायजरमध्ये दहशतीच्या सावटात मतदान

इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली नुकतेच नायजरमध्ये मतदान झाले. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच नायजरमधील जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान केले. त्याचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत.

सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इस्सोफोऊ हे दहा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पायउतार होत आहेत. त्यांच्या पक्षातील सध्या परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्री असलेले मोहम्मद बाझोऊम हे राष्ट्राध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार आहेत. 

फ्रान्सकडून १९६० स्वातंत्र्य मिळाल्यापासून नायजमध्ये चार वेळेला सत्तापालट झाला आहे. साठ वर्षीय बाझोऊम यांनी नायजरमधील भ्रष्टाचार दूर करण्याचे आणि इस्सोफोऊ यांच्या धोरणांना पुढे चालवण्याचे आश्वासन दिले आहे.

मात्र बाझोऊम यांचा मार्ग सुकर नाही. त्यांना निवडणूकीत २९ उमेदवारांचा सामना करावा लागला आहे. बाझोऊम यांना स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीची गरज पडू शकते. या उमेदवारांत दोन माजी राष्ट्राध्यक्षांचा देखील समावेश आहे. 

प्रमुख विरोधी उमेदवार हामा आमाडोऊ यांना २०१७ मध्ये बालतस्करीच्या १२ महिने तुरूंगवासाची सजा झाली होती. नायजरमधील उमेदवारीचा कायदा एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरूंगात शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवतो. त्याचा आधार घेत नायजरमधील कोर्टाने हामा आमाडोऊ यांची उमेदवारी अवैध ठरवली आहे. 

या निवडणूकीत ७४ लाख लोकांनी देशाचा पुढील राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी १७१ जागांसाठी मतदान केले आहे. मात्र विजेत्या उमेदवाराला जिहादींपासून देशाला सुरक्षित ठेवण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे.

डी.डब्ल्यु संस्थेच्या वार्ताहराच्या सांगण्यानुसार, मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याइतके मोठे प्रसंग घडले नाहीत. काही ठिकाणी मत खरेदी करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले मात्र ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे उघडकीस आले. 

या सगळ्या प्रक्रियेत डिफ्फा शहराजवळ मोठे धमाके ऐकू आले. त्यामुळे काही काळ नागरिकांत घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने ते स्फोट डिफ्फा शहरात झाले नव्हते तर शेजारच्या चॅड नावाच्या देशात झालेले ऐकू आले होते.

नायजर हा विविध बाजूंनी जिहादीं वेढलेला देश आहे. माली आणि बुर्किना फासो या पश्चिमेकडील देशात अल् कायदा आणि इस्लामिक स्टेट आहेत. इस्लामिक स्टेटसोबत हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असलेली बोको हराम ही दहशतवादी संघटना खुद्द नायजरमध्ये आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार नायजर हा अति-गरीब देशांपैकी एक आहे. जागतिक बँकेच्या सांगण्यानुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्येचे प्रतिदिन उत्पन्न $१.९० पेक्षाही कमी आहे, आणि देशातील सुमारे २३ मिलीयन लोकसंख्या अन्नासाठी मदतीवर निर्भर आहेत.

Exit mobile version