पॉर्न-ड्रग्सच्या विळख्यात मालवणीतील शाळकरी मुले

पॉर्न-ड्रग्सच्या विळख्यात मालवणीतील शाळकरी मुले

(फोटो प्रातिनिधिक)

मालवणीतल्या शाळकरी मुलांना ड्रग्स आणि पॉर्नच्या विळख्यात ढकललं जात आहे अशी तक्रार राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे करण्यात आली आहे. दलित समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंट’ या संघटनेने ही तक्रार केली आहे. १२ जानेवारी रोजी ‘न्युज डंका’ने मालवणीतले खळबळजनक वास्तव समोर आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मालवणीत राहणाऱ्या दलित हिंदूंवर मालवणी सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे मालवणीतल्या दलित कुटुंबातील लहान मुलांना ड्रग्स आणि पॉर्नच्या विळख्यात पद्धतशीरपणे ढकललं जात आहे. “मालवणीतले स्थानिक गुंड दलित कुटुंबातील लहान मुलांना ड्रग्स आणि पॉर्नच्या दलदलीत ढकलत आहेत. हा तोच भाग आहे जिथून दलित कुटुंबाना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि आमचा असा विश्वास आहे की लहान मुलांवर होणारे अत्याचार एका मोठ्या कटाचा भाग आहे. लहान मुलांमध्ये वाढलेल्या व्यसनाधीनतेमुळे त्यांचे कुटुंब मुलांचे भवितव्य वाचवण्यासाठी घर सोडून पलायन करायला मजबूर होतील.” असे या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही पहा: हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

या प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने चौकशी समिती नेमावी आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, पॉस्को कायदा आणि ऍट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ‘दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंट’ ने केली आहे.
‘दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंट’ चे राष्ट्रीय संयोजक पी.रवी यांनी डंकाशी बोलताना सांगितले की “दलितांवर दिवसाढवळ्या होणाऱ्या अत्याचाराची दखल मुख्य प्रवाहातील कोणतीच माध्यमे घेत नाहीत हे धक्कादायक आहे. अत्याचाराचे बळी ठरलेल्या दलित कुटुंबाना मिळणारी अवमानकारक वागणूक निंदनीय आहे. भीम-मीम सारखे दिशाभूल करणारे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांसाठी आणि दलित समाजासाठी हा एक इशारा आहे. कारण आज २१ व्या शतकातही दलित समाजाला धार्मिक कट्टरतावादी शक्तींकडून द्वेष आणि गुन्हेगारी सहन करावी लागत आहे. ‘दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंट’ मालवणीला पुढचे काश्मीर, कैराना होऊ देणार नाही.

Exit mobile version