देशात भाजपाला अनुकूल वातावरण आहे. भाजपाचे देशात तिसऱ्यांदा सरकार येणार याची खात्री फक्त भारतीयांना नाही तर विदेशातील मुत्सद्दी, राजकीय नेते, गुप्तचर यंत्रणांनाही आहे. परंतु योगेंद्र यादव यांना मात्र असे वाटत नाही. भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असा प्रचार भाजपा समर्थक आणि भाजपा प्रेमी मीडिया चालवत असला तरी त्यात काडीमात्र तथ्य नाही, प्रत्यक्षात भाजपासह रालोआच्या १०० जागा कमी होणार असून रालोआला साधे बहुमत सुद्धा मिळणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त आहे.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. मतदानाचा टक्का २०१९ च्या तुलनेत कमी आहे. परंतु हा फरक मोठा नाही. आजवर जे ओपिनिअन पोल जाहीर झाले, त्यात मोदी सरकार सत्तेवर येणार नाही, असा एकही अंदाज कोणी व्यक्त केलेला नाही. एक्सिस माय इंडीयाचे सर्वेसर्वा प्रदीप गुप्ता यांनी मॅक्सिस माय इंडीयाच्या सर्व्हेमध्ये २०१९ लोकसभेच्या तुलनेत यंदाच्या निकालामध्ये फार फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
ओपिनिअन पोल हे फार विश्वासार्ह नसतात असा अनुभव आहे. परंतु योगेंद्र यादव हेही त्याला अपवाद नाहीत. ओपिनिअन पोलमध्ये किमान काही हजार लोकांचे मत घेऊन अंदाज काढतात. योगेंद्र यादव यांचा अंदाज हा मात्र त्यांचे वैयक्तिक ओपिनिअन आहे. रालोआची सत्ता येणार नाही, असे त्यांना वाटते, याचाच अर्थ देशात पुन्हा एकदा खिचडी सरकार येणार असे ते आडून आडून सांगतायत. याबाबतीत योगेंद्र यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकवाक्यता दिसते. एवढ्या मोठ्या देशाला दहा वर्ष एकच पंतप्रधान कशाला? देशात मिलिजुली सरकारची गरज आहे. असे मत ठाकरेही व्यक्त करतायत.
योगेंद्र यादव हे वैचारीकदृष्ट्या डावे आहेत. सेफॉलॉजिस्ट म्हणून ते लोकांना परीचित होते. अण्णा आंदोलनानंतर ते हळूच आम आदमी पार्टीच्या कंपूत शिरले. आपचे नेते झाले. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी २०१५ मध्ये पक्षातील बड्या धेंडांचा गेम केला. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्यात प्रशांत भूषण यांच्यासोबत योगेंद्र यादवही होते. हकालपट्टीनंतर त्यांनी स्वराज अभियान नावाचे दुकान सुरू केले.
हरियाणाच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केले. यादव यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतरही अध्येमध्ये त्यांच्यातला सेफॉलॉजिस्ट जागा होतो. ते निवडणुकीचे अंदाज व्यक्त करू लागतात. शंभर हा बहुधा त्यांचा आवडता आकडा असावा.
२०१९ च्या निवडणुकीत रालोआच्या शंभर जागा कमी येतील असे भाकीत त्यांनी केले होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होते आहे. देशात आणीबाणी सदृश्य वातावरण आहे. लोकशाही संस्थांना धोका निर्माण झालेला आहे. लोक भाजपाच्या राजवटीला कंटाळलेले आहेत, त्यामुळे भाजपाच्या शंभारावर जागा कमी होतील, असा साक्षात्कार त्यांना झाला होता. २२ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी हे भाकीत केले होते. भाजपाला २२२ ते २३२ जागा मिळतील. रालोआच्या जागा २६३ ते २८३ असतील असे आकडेही त्यांनी जाहीर केले होते.
प्रत्यक्षात झाले भलतेच भाजपाच्या खासदारांची संख्या २८२ वरून थेट ३०३ झाली रालोआचा आकडा ३५३ वर गेला. योगेंद्र यादव यांनी चुकीचे भाकीत केल्याची ही एकमेव घटना नाही. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत, २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, भाजपासाठी निकाल चांगले नसतील असे भाकीत त्यांनी केले होते. योगेंद्र यादव हे असामान्य आहेत. कारण जाहीरपणे माती खाल्ल्यानंतर सर्वसामान्य माणूस पुन्हा बकवास करण्याच्या भानगडीत पडत नाही. योगेंद्र यादव २०१४ पासून सतत तोंडावर आपटले असताना पुन्हा त्यांनी २०२४ च्या निकालांचे भाकीत केले आहे. भाजपाच्या जागा ७५ ने कमी होतील, मित्र पक्षांच्या जागा २५ ने कमी होतील. रालोआ बहुमताच्याही खाली येईल असे हे भाकीत आहे.
हे ही वाचा:
इराण- भारतमधील चाबहार बंदराचा करार अमेरिकेला खुपला; निर्बंधांची दिली धमकी
दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी आता ‘आप’ आरोपी
पुरात सापडलेल्या केनियाला भारताने पुन्हा दिला मदतीचा हात!
२०१९, २०२४च्या मतदानपद्धतीत कोणतीही उलथापालथ नाही! गुप्ता यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्रात रालोआच्या जागा किमान २० ने कमी होतील. म्हणजे ४२ वरून थेट २२ वर येतील असे योगेंद्र यादव सांगतायत. साफ बुडालेल्या माणसाला कुण्या कुडमुड्या जोतिषाने किंवा अगदी रस्त्यावरच्या नंदीबैल वाल्याने सांगितले की तुझा वाईट काळ संपला, लवकरच तुझा सुवर्णकाळ सुरू होतो आहे, असे सांगितले की त्याला कसे गार गार वाटते वाटते तशी अवस्था ठाकरे गटाची झालेली आहे.
योगेंद्र यादव यांचा भाविष्यवाणीवाला व्हीडीयो ठाकरे गटातील लोक अत्यंत चवीने बघतायत. मुळात योगेंद्र यादव यांना जे वाटते आहे, तेच रवीश कुमार, पुण्यप्रसुन वाजपेयी, मृत्यूंजय झा, दिपक शर्मा, अजित अंजुम यांनाही वाटते आहे. परंतु ते मोघम बोलतायत, देशातील वातावरण बदलते आहे, मतदानाच्या अमुक तमुक टप्प्यानंतर देशातील राजकारणाने अचानक वेगळे वळण घेतले आहे. लोकांचा मूड बदलतो आहे. म्हणजे ज्या शब्दात शरद पवार बोलत असतात त्याच शब्दात ही मंडळी सुद्धा बोलत असतात. परंतु योगेंद्र यादव यांचे भाकीत व्हायरल होते आहे, त्याचे कारण त्यांनी थेट आकडा सांगितला आहे. हा आकडा ठाकरे गटाच्या समर्थकांना सुखावतो आहे. मैलभर उन्हातून चालत आलेल्या एखाद्याला थंडगार नीराचा ग्लास मिळावा तो इफेक्ट योगेंद्र यादव यांच्या भाकीताने केलेला आहे. भाजपाच्या पराभवाची ही भविष्यवाणी म्हणजे राहुल गांधींसह ठाकरे सत्तेवर येण्याची भविष्यवाणी.
अशा सर्व लोकांनी शुद्धीवर येण्यासाठी यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी केलेली भविष्यवाणी एकदा ऐकून घ्यावी.
थ्री इडीयट मधल्या चौकीदाराप्रमाणे योगेंद्र यादव इंडी आघाडीसाठी आल इज वेल, बोलत फिरतायत. सिनेमातील वॉचमनची नजर कमजोर असते. इथे यादव यांनी विश फूल थिंकींगचा चष्मा घातला आहे. जे आजूबाजूला घडते आहे ते यादव बोलत नसून जे घडावेसे त्यांना वाटते आहे, तेच ते बोलतायत. सुदैवाने देशातील जनता खुळी नाही. ती योगेंद्र यादव यांच्यासारख्या लोकांना पुरती ओळखून आहे. ती अशा भाकीतांना भीक न घालता, आपले काम चोखपणे करते आहे. जनतेला राजकारणातील अशा उल्हास बापट प्रवृत्तींचा पुरेपूर अनुभव आलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)