छे छे, राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

भारतात मुरलेली लोकशाही हा अमेरिका आणि राहुल गांधी यांच्या दृष्टीने मोठा अडथळा

छे छे, राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची तरफदारी करणारे एक पत्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर एक दहशतवादी आहेत, त्यांची जीभ छाटायला हवी, जीभेवर चटके द्यायला पाहिजेत, आदी टीकेमुळे व्यथित होऊन खरगे यांनी हे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देता देता त्यांनी हा सगळा हिशोब मांडला आहे.

ज्यांच्यामुळे आपले पद-प्रतिष्ठा टिकली आहे, त्यांचे अस्तित्व टिकायला हवे, आयुष्य वाढायला हवे, ही खरगेंची भावना काही चुकीची नाही. राहुल-सोनिया कृपेमुळे ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यामुळे राहुल यांच्यावर कोणतेही बालंट येऊ नये ही त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. उबाठा शिवसेनेचे संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची भीती व्यक्त केलेली आहे. दोघांनी व्यक्त केलेल्या चिंतेमुळे राहुल गांधी यांच्या मनात या दोन्ही नेत्यांबद्दल असलेले प्रेम वृद्धींगत होईल यात शंका नाही. पुढच्या वेळी जेव्हा राहुल गांधी संजय राऊत यांना भेटतील तेव्हा ते अधिक प्रेमाने त्यांना मिठी मारतील.

राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा भारतातील लोक त्यांना लाखोली वाहू लागतात. ‘भारत हा एक देश नसून राज्यांचा समुह आहे’, अशी बिनडोक आणि देशविरोधी विधाने केल्यामुळे जनता त्यांना लक्ष्य बनवते. राहुल हे विरोधी पक्षनेते आहेत, नेहरु-गांधी घराण्याचे वंशज आहेत. त्यामुळे ते महत्वाचे आहेत, असे खरगे यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ते देशापेक्षा, देश हितापेक्षा महत्वाचे नाहीत, ही जनतेची भावना सुद्धा त्यांनी समजून घेतली पाहिजे.

हे ही वाचा:

बुलढाणा; जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक !

लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले

सनातन धर्म…पुस्तकाची कहाणी पॉडकास्टच्या रूपात लवकरच येणार समोर, टीझर जारी

काँग्रेसची इकोसिस्टम खवळली, ‘सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या’

अलिकडेच राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा पार पडला. या दौऱ्यातही त्यांनी अक्कल पाजळली. वारंवार देशहिताला गालबोट लावणारी वक्तव्य केली. त्यांच्या एका वक्तव्यामुळे खलिस्तानच्या मागणीला बळ मिळाले, असे विधान खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याने व्यक्त केले.

पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीचा रक्तरंजित इतिहास ज्यांना ठाऊक आहे, ज्यांनी तो प्रत्यक्ष अनुभवला आहे त्यांना या वक्तव्यामुळे तिडीक येणे स्वाभाविक आहे. खालिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेले पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंह यांचे नातू केंद्रीय मंत्री रवनीत सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. ते देशातील नंबर एकचे दहशतवादी आहेत, असे ते म्हणाले.

राहुल गांधी देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत वारंवार दिसतात. अमेरिकेत गेल्या वर्षी ते सुनीता विश्वनाथन हिच्यासोबत दिसले होते. ही बाई जॉर्ज सोरोसच्या गोतावळ्यातील एक महत्वाची एनजीओ चालवते. यावेळी ते अमेरिकी सिनेटर, कट्टर जिहादी आणि भारतविरोधी मानसिकता असलेल्या इल्हान ओमार सोबत दिसले. बांगलादेशात हिंदूंच्या रक्तरंजित कत्तली करणाऱ्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांसोबत दिसले. खलिस्तानवाद्यांना गुदगुल्या होतील अशी तद्दन खोटारडी विधाने त्यांनी अमेरिकेत केली. तरीही जनतेने शांत राहावे आणि राहुल यांच्या देशविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करावे, अशी खरगे यांच्यासारख्या नेत्यांची अपेक्षा असते. ते स्वाभाविकही आहे, कारण त्यांच्यासाठी राहुल गांधी हे देशापेक्षा मोठे आहेत.

हे सगळे करण्याच्या मागची राहुल यांची भूमिका स्पष्ट आहे. देशातील काँग्रेस पक्ष एकहाती भाजपाचा राजकीय पराभव करू शकत नाही. २०२४ पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी अनेक पक्षांना एकत्र करून इंडी अलायन्स नावाचे दुकान काढण्यात आले. तरीही उपयोग झाला नाही. मोदी पुन्हा सत्तेवर आले. २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा काँग्रेस सत्तेपासून वंचित आहे. २०२९ मध्ये हा पक्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेवर येईल याची अजिबात शक्यता नाही.

सनदशीर मार्गाने, लोकशाही पद्धतीने राहुल गांधी यांच्या नशिबी पंतप्रधानपदाचा योग काही केल्या दिसत नाही. त्यामुळे ते मोहमद युनूस मार्गाने देशाच्या सत्तेवर येऊ इच्छितात. अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा पदर पकडून देशात सत्ता स्थापन करण्याचा हा मार्ग आहे. ‘भारतात लोकशाहीला मोठा धोका निर्माण झालेला असून ही लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी युरोप आणि अमेरिका फारसे काही करताना दिसत नाही’, अशी खंत त्यांनी गेल्या वर्षी ब्रिटन दौऱ्यात व्यक्त केली होती. ही विधाने राहुल यांच्या याच धोरणाचा भाग आहेत. देशात सत्तेवर कोण येणार हे युरोप आणि अमेरिकेने ठरवावे ही त्यांची इच्छा आहे. पाश्चात्य देशांनाही आपल्या कलाने सत्ता राबवणारा लोंबत्या हवा आहे, त्यामुळे राहुल यांना वारंवार विदेश दौऱ्याची निमंत्रण आणि मुक्ताफळे उधळण्याची संधी मिळत असते.

२०२३ मध्ये राहुल यांनी अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड लू यांची गोपनीय भेट घेतली होती. लू हे अमेरीकेच्या दक्षिण-मध्ये आशिया ब्युरोचे असिस्टंट सेक्रेटरी आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे अत्यंत विश्वासू. पाकिस्तानातील इम्रान खान आणि बांगलादेशातील शेख हसीना यांची राजवट उलथून टाकण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. तीच भूमिका त्यांनी भारतात पार पाडावी आणि अमेरिकेच्या लोंबत्याची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती व्हावी ही अमेरिकेचीही इच्छा आहे.

राहुल यांची वक्तव्य, त्यांच्या गाठीभेटी याचा सरळ अर्थ काढला तर त्यांनाही मोहम्मद युनूस मार्गाने सत्तेवर यायचे आहे. या देशात अराजक निर्माण करून युनूस यांच्यासारख्या प्याद्याला सत्तेवर आणण्याचा हा फॉर्म्युला अमेरिकेने बांगलादेशात यशस्वीपणे वापरला.

भारताची ताकद आणि वजन दोन्ही जास्त आहे. भारतात लोकशाही मुरलेली आहे. हा अमेरिका आणि राहुल गांधी यांच्या दृष्टीने मोठा अडथळा आहे. जनतेच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेले मोदी सरकार हटवल्याशिवाय हे शक्य नाही. त्यासाठी देशात बांगलादेश प्रमाणे घाऊक आंदोलने, जाळपोळ, अराजकाची स्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही काळापूर्वी शेतकरी आंदोलनातील नेत्यांना अमेरिकी दूतावासाचे चहापानाचे निमंत्रण आले होते. उघड उघड अमेरिकेने भारतात हस्तक्षेप चालवला आहे.

राहुल गांधी देशविरोधी शक्तींसोबत गळ्यात गळे घालत असताना, त्यांच्यासोबत चर्चा करत असताना विरोधात बोलायचे नाही, अशी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा आहे. जीभ छाटून टाकू… या भाषेवर आक्षेप असू शकतो. परंतु अशी वक्तव्ये तर मोदींच्या विरोधात सतराशे साठ सापडतील. त्यातली अनेक राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगे यांनीच केलेली आहे. मोदी की कबर खोदेंगे… हे वाक्य वानगी दाखल सांगता येईल. त्यामुळे राहुल हे दहशतवादी नसले तरी अराजकवादी आहेत, असा जर देशातील जनतेचा समज झाला असेल तर तो चुकीचा कसा म्हणावा?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version