मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे लाख मोलाची….

मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे लाख मोलाची….

गेले काही दिवस सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे अखेर परिमार्जन झाले. रेणू शर्मा प्रकरणातून ते तेजपुंज आणि लखलखत्या चेहऱ्याने बाहेर आले. तक्रारदार मेव्हणी रेणू शर्मा हीने त्यांच्या पारदर्शी चरित्र्यासमोर गुढगे टेकत बलात्काराची तक्रार मागे घेतली. दोन बायकांसोबत अत्यंत प्रामाणिकपणे संसार करणारे मुंडे हे बलात्कारी नसून त्यांचा दामन साफ आहे, ही बाब जगासमोर आली.

खरे तर ही गोष्ट तेव्हाच सिद्ध झाली होती जेव्हा मुंडेंना शरद पवारांचे सर्टीफीकेट मिळाले. महिलेच्या विरोधात आलेल्या काही तक्रारींचा उल्लेख करून पवारांनी याप्रकरणी दूध का दूध आणि पानी का पानी… केले, पवारांच्या बेरक्या नजरेतून काहीच सुटत नाही, ज्यांनी महाराष्ट्रात देशातील पहिले महिला धोरण राबवले, त्यांचा एखाद्या महिलेबाबतचा अंदाज चुकण्याची शक्यता नव्हतीच. एकदा पवारांना मुद्दा पटल्यावर पोलिस अधिका-यांचा विश्वास बसायला किती वेळ लागणार होता. पवारांचे सहकारी तर सोडा विरोधकही त्यांच्या शुद्ध चारित्र्याचे चाहते आहेत. कारण पवार साहेब म्हणतील तेच धोरण, पवार साहेब लावतील तेच तोरण.

रेणू शर्मा यांच्याकडे काही फोटो आणि व्हीडीओ असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले होते. परंतु राज्यातील एखाद्या तालेवार मंत्र्याचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा अशा ‘फुटकळ’ पुराव्यांना काही अर्थ नसतो. आणि मेव्हणीचे आरोप म्हणजे घर की बात. उगाच घरातला मामला चव्हाट्यावर कशाला? रेणू शर्माने बराच जोर लावल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही हे एक बरे झाले. नाही तर मुंडेंच्या प्रतिमेला विनाकारण गालबोट लागले नसते का?

खणखणीत चारीत्र्यामुळेच मुंडेच्या दोन्ही पत्नी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. यशस्वी पुरुषामागे एका पेक्षा अधिक महिला असू शकतात हेही यावरून सिद्ध व्हावे. दुसरी पत्नी तर सख्ख्या बहीणीच्या पाठीशी उभी न राहता, मूकपणे का होईना मुंडेंच्या पाठीशी उभी राहीली. नव-याचा तोल ढळणार नाही याबाबत बायकोला खात्री असते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्या माणसाचे वाकडे करू शकत नाही. इथे तर मुंडेंवर तर दोन दोन बायकांचा विश्वास. त्यांचे कोण वाकडे करू शकणार?

संशयाचे धुके हळूहळू फिटत गेले आणि मुंडेचे मन आणि चारीत्र्य शुद्धच असल्याचा उलगडा झाला. परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप झाले तेव्हा त्यांच्या राजीनाम्यासाठी आवाज उठवणारी शिवसेना मुंडेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली ती त्यांच्या धवल चारीत्र्याबाबत खात्री असल्यामुळेच. आता तक्रार मागे घेतली तरी गेले पाच दिवस झालेल्या मुंडेंच्या चारीत्र्यावर उडवलेल्या शिंतोड्यांचे काय, असा सवाल मुंडेंच्या प्रतिष्ठ सहकाऱ्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच होते. अजित पवारांनी नेमका हाच सवाल उपस्थित केला. विनाकारण बदनामीचे दु:ख त्यांच्या इतके कुणाला ठाऊक असेल, सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी कसे कसे सहन केले हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यांच्याविरोधातही एकदा मोबाईल चॅटवरून असे वादळ उठले होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे देखील धनंजय मुंडेंसाठी कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी मुंडेच्या बदनामीबाबत खंत व्यक्त केली. हा सर्व ब्लॅकमेंलिंगचा प्रकार होता, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. भुजबळ हा सच्चा माणूस. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी त्यांच्या नशीबी तुरुंगवास आला तो अशाच ब्लॅकमेलिंगमुळे. तिथे येणा-या छातीतल्या कळा ते कसे विसरतील? बेलवर बाहेर आलेल्या भुजबळांचा मुंडेच्या प्रकरणामुळे उर भरून आला नसता तरच नवल. सच्चे का बोलबाला आणि झूटे को मुह काला, या उक्तीचा प्रत्यय देणारा हा घटनाक्रम. याप्रकरणाचा तपास न झाल्यामुळे रेणू शर्माकडे असलेल्या फोटोत, त्या व्हीडीओत काय होते हे मात्र आता कधीच उघड होणार नाही.

Exit mobile version